उपचार मिळत नसल्याने आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पोलिसाचा अखेर कोरोनाने मृत्यू - Policeman who gave a warning of suicide finally died | Politics Marathi News - Sarkarnama

उपचार मिळत नसल्याने आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पोलिसाचा अखेर कोरोनाने मृत्यू

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 29 एप्रिल 2021

सचिन इंगोले या पोलिस कर्मचाऱ्याने योग्य उपचार मिळत नसल्याने आत्महत्या करत असल्याचा इशारा दिला होता 

हिंगोली : शासकीय रुग्णालयामध्ये योग्य उपचार मिळत नाही. वरिष्ठांना सांगूनही त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे आत्महत्या करत असल्याचा अॅाडिओ मेसेज पोलिस अधिक्षकांना पाठवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा आज अखेर कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. अॅाडिओ मेसेजनंतर त्यांच्यावर योग्य उपचारासाठी पोलिसांनी धावपळ केली मात्र त्याला खूप उशीर झाला होता.

कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने रुग्णालयांवरील ताण वाढला आहे. रुग्णांना बेड, अॅाक्सीजन, रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्यात अडचणी येत आहेत. बेड मिळाला तरी योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. मनुष्यबळाअभावी आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढला आहे. अशातच सचिन इंगोले या पोलिस कर्मचाऱ्याने योग्य उपचार मिळत नसल्याने आत्महत्या करत असल्याचा इशारा पोलिस दलाला दिला होता. 

हिंगोली येथे ही घटना घडली आहे. हिंगोली जिल्हा पोलिस दलातील पोलीस कर्मचारी सचिन इंगोले यांनी उपचार सुरू असलेल्या रुग्णालयावरून उडी घेत आत्महत्या करत असल्याचा अॅाडिओ मेसेज पोलिस अधिक्षकांना केला होता. माननीय एसपी साहेब मी पोलीस कर्मचारी असताना मला रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याने मी रुग्णालयाच्या टेरेसवरून उडि घेत आत्महत्या करत आहे, असे इंगोले यांनी मेसेजमध्ये म्हटले होते.

इंगोले यांच्या अॅाडिओ मेसेजमुळे पोलिस दलात खळबळ उडाली. सचिन इंगोले गेल्या अनेक दिवसांपासून कुटुंबीयांसोबत रुग्णालयात उपचार घेत होते. इंगोले यांना अस्थमा सह इतर आजारही होते. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

"शासकीय रुग्णालयातील डॉक्टर वारंवार विनंती करूनही लक्ष देत नाहीत. पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना मदतीची मागणी केली. त्यानंतरही मदत मिळाली नाही,'' अशी खदखद इंगोले यांनी व्यक्त केली होती. दरम्यान, ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताच, जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी इंगोले यांच्यासह कुटुंबीयांना तातडीने मदत करण्याचे आदेश दिले होते. पण आज इंगोले यांचा मृत्यू झाला. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख