मुंबईत राहणाऱ्यांचा ऊसतोड मजुरांशी काय संबंध? : मेटेंचा पंकजांना नाव न घेता सवाल  - MLA Vinayak Mete criticizes Pankaja Munde on the issue of sugarcane workers | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईत राहणाऱ्यांचा ऊसतोड मजुरांशी काय संबंध? : मेटेंचा पंकजांना नाव न घेता सवाल 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

कामगारांच्या प्रश्‍नावर बोलण्यापेक्षा कारखान्याच्या प्रश्‍नावर बोलणारे अधिक आहेत. फक्त दिवंगत गोपीनाथ मुंडेच ऊसतोड कामगारांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देत होते. आता त्यांचे नाव घेतले जाते. मात्र, त्यांच्या विचारांना तिलांजली देत कामगारांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे म्हणाले. 

बीड : ऊसतोड कामगारांचा लवाद कामगारांच्या नावावर कारखान्याची बाजू घेतो. कामगारांच्या प्रश्‍नांपेक्षा कारखान्याच्या प्रश्‍नावर बोलणारे अधिक आहे. फक्त दिवंगत गोपीनाथ मुंडेच ऊसतोड कामगारांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देत होते. आता त्यांचे नाव घेत त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे प्रत्येक ऊसतोड कामगाराने आता गोपीनाथ मुंडे व्हावे अन्‌ अन्यायाविरूद्ध उभे राहावे, असे आवाहन शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केले. 

शिवसंग्रामच्या पुढाकाराने सोमवारी (ता. 28 सप्टेंबर) तालुक्‍यातील मांजरसुंबा येथे ऊसतोड कामगारांच्या मेळाव्यात मेटे बोलत होते. या वेळी मेटे यांनी नाव न घेता माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर, तर नाव घेऊन सुरेश धस यांच्यावर टीका केली. 

आमदार मेटे म्हणाले, ऊसतोड कामगारांबाबतचा लवाद फसवा असून तो कामगारांसाठी नाही तर कारखानदारांसाठी आहे. 17 नोव्हेंबर 2015 रोजी झालेला करार वाचून दाखवत या करारामध्ये ऊसतोड कामगारांसाठी काहीच नसून फक्त कारखानदारांसाठीच सर्व काही असल्याचा आरोपही मेटे यांनी केला. 

ऊसतोड कामगारांच्या नावावर कारखान्याचे हित

दिवंगत गोपीनाथ मुंडे हे ऊसतोड कामगारांच्या प्रश्‍नावर लढायचे, भांडायचे. परंतू, आता स्वत:ला ऊसतोड कामगारांचे नेते म्हणणारे, ऊसतोड कामगारांच्या नावावर कारखान्याचे हित पाहत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. त्यामुळे प्रत्येक ऊसतोड कामगाराने स्वत: गोपीनाथ मुंडे होऊन आपल्यावरील अन्यायाविरूद्ध आवाज उठवावा. आपला व ऊसतोड कामगारांचा संबंध काय? असे विचाराऱ्यांना मुंबईत राहणाऱ्यांचा आणि ऊसतोड कामगारांचा संबंध काय? याचे उत्तर द्यावे. आपण या मातीत जन्मलो, ऊसतोड कामगारांसोबत लहानाचा मोठा झालो. त्यामुळे यापुढे ऊसतोड कामगारांवर होणारा अन्याय सहन करणार नाही, त्यांच्यासाठी कोणाच्याही अंगावर जाण्यास मागेपुढे पाहणार नाही, असेही विनायक मेटे म्हणाले. 

धस कोणाच्या आदेशाने महाराष्ट्रभर फिरतात? 

सध्या आमदार सुरेश धस या प्रश्‍नावर बोलतात. आपल्या माहितीनुसार त्यांना त्यांच्या तालुक्‍यापुरतीच जबाबदारी दिली होती. परंतू, ते महाराष्ट्रभर कोणाच्या आदेशाने फिरतात, हे मला माहीत नाही, असेही मेटे म्हणाले. आमदार धस यांना सोबत येण्याचे आवाहन करत कामगारांचा धर्म आणि जात ही कामगारच आहे. त्यामुळे कामगारांच्या कष्टाला त्यांच्या अधिकाराला, मोबदला मिळालाच पाहिजे. 

राज्यात सर्व कामगारांसाठी कायदा आहे; परंतु ऊसतोड कामगारांसाठी कायदा नाही. तो कायदा झाला पाहिजे. कारखान्यांना द्यायला सरकारकडे पैसे आहेत. मात्र, कामगारांना देण्यासाठी नाहीत, असेही विनायक मेटे म्हणाले. 

लवाद मान्य नाही 

या प्रश्नासाठी आपण सहकार मंत्री, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अन्य मंत्र्यांकडे गेलो. पण, अद्यापही काहीच उत्तर मिळाले नाही. सध्याचा लवाद ऊसतोड कामगारांच्या विरोधातला असून आम्हाला हा लवाद मान्य नाही. आधी हा लवाद बंद करा. कारखान्यांची बाजू घेणारा लवाद बंद झाला पाहिज, अशी मागणी करत ऊसतोड कामगारांसाठी सरकारने समिती तयार करावी. 
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये निवासी शाळा सुरु करावी. तीन वर्षांचा लवाद करार दोन वर्षांचा करावा अशी मागणीही मेटे यांनी केली. 

ऊसतोड कामगार महामंडळ कुठे आहे? 

थकहमीसाठी कारखाने सरकारकडून प्रत्येक वर्षाला पैसे घेतात. मग ऊसतोड कामगारांना का नको? असा सवालही त्यांनी केला. 
दिवंगत गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ कुठे आहे? परळीत त्याचे कार्यालय सापडत नाही. या महामंडळाला सुरु करायचे काम कुणाचे होते? असा सवाल करुन महामंडळ त्वरित सुरु करावे, अर्थसंकल्पीय तरतुदींप्रमाणे मंत्री धनंजय मुंडे यांनी निधी उपलब्ध करून द्यावा, असेही मेटे म्हणाले. 

संघटनेचे अध्यक्ष बबनराव माने, जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, सरचिटणीस अनिल घुमरे, विनोद कवडे, युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पवळे, तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, लिंबराज वाघ, कैलास माने ज्ञानेश्वर कोकाटे, सुनील शिंदे, मीरा डावकर, साक्षी हांगे, अक्षय माने, गणेश खांडेकर, जी. एस. चौधरी, रामदास नाईकवाडे, योगेश शेळके, शेषेराव तांबे, सीताराम घुमरे, उल्हास घोरड, अनिकेत देशपांडे, दत्ता गायकवाड, दादा गोंदवले, नामदेव गायकवाड, हिरामण शिंदे, गुरसाळी महाराज, विश्वास पाटील, भीमराव जाधव, रमेश राठोड, भीमराव बेलदार, भारत शिंदे, आश्रुबा कदम, शेंडगे आदी उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख