opposition leader devendra fadnavis slams state government | Sarkarnama

चंद्रकांतदादांवर टीका झाली त्यावेळी काही बोलला नाहीत : देवेंद्र फडणवीस

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 जून 2020

राजकारणात कोणीही खालच्या पातळीवरील भाषा वापरत असेल तर, त्याचे समर्थन करणे थांबवायला हवे, असे सांगून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

अकोला : महाराष्ट्राने राजकीय संस्कृती जपली असून, राजकारणात कुणीही खालच्या पातळीची भाषा वापरत असेल तर, त्याचे समर्थन होणार नाही. हे थांबवायलाच हवे , असे वक्तव्य भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. भाजपने नेहमीच ही संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला मात्र, चंद्रकांतदादांवर टीका झाली त्याचा कुणी साधा निषेधही केला नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. 

फडणवीस येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.  ते म्हणाले की, संस्कृती जपण्याची जबाबदारी  ही सर्वच पक्षांची असून, इतर पक्षांनीही ती जबाबदारी निभावली पाहिजे. कारण गोपीचंद पडळकर यांच्याशी मी चर्चा केली असून, सर्व आपले राजकीय विरोधक असून, शत्रू नाहीत, असे सांगितले आहे. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका झाली त्यावेळी विरोधक काही बोलले नव्हते. 

काँग्रेस पक्षाने चिनी दूतावासाकडून राजीव गांधी फाउंडेशनसाठी घेतलेल्या निधी हा कसा घेतला, त्या निधीच्या बदल्यात काँग्रेस पक्षाने चीनला कुठली मदत केली व कुठली माहिती दिली, अशी विचारणाही फडणवीस यांनी केली. ते म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी चिनी कंपन्यांनी पीएम केअर फंडाला मदत केल्याचे  म्हटले आहे. या कंपन्यांनी 'सीएसआर'अंतर्गत पीएम केअर फंडाला मदत केली तर काय झाले. पहिल्यांदा बाळासाहेब थोरातांनी चीनच्या दूतावासाने राजीव गांधी फाउंडेशनला दिलेल्या निधीचा हिशोब द्यावा. 

बोगस बियाण्याचा विषय अत्यंत गंभीर आहे. बियाणे कायद्यानुसार बोगस बियाणे विकणार्‍या कंपन्यांनी नुकसानभरपाई द्यायला हवी. शेतकर्‍यांना मागील सरकारने मदत दिली. राज्य सरकारने पुढाकार घेऊन  नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत केली पाहिजे. खत बांधावर अद्याप बांधावर पोचले नाही. बोगस बियाण्यांमुळे दुबार पेरणीची अवस्था आली असताना बियाणेच मिळत नाही. गेल्या पाच-सहा वर्षांत मोदी सरकारच्या काळात कुठलाही तुटवडा जाणवला नाही. राज्य सरकार कृत्रित टंचाई करत आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. 

देशातील कोरोनाच्या एकूण मृत्यूपैकी 46 टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रात असल्याने गंभीर परिस्थिती आहे. सरकारला हे रोखण्यासाठी प्रयत्न आणखी वाढवावे लागणार आहेत. राज्य सरकारला या स्थितीकडे अधिक गांभीर्याने पहावे लागेल. राज्य सरकारकडून महापालिकांना अजूनही आर्थिक मदत नाही, हे दुर्दैवी आहे. यातून कोरोनाविरोधातील लढाई कमकुवत होईल. चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख