तो `अनुभव` यायला आमदार अमोल मिटकरींना सहा महिने लागले....

राज्यातील आरोग्यव्यवस्था कशी मरणप्राय झाली आहे, हे मिटकरी यांच्या अनुभवातून कळते...
amol mitkari.jpg
amol mitkari.jpg

पुणे : कोरोनाने राज्यभरातील आरोग्यव्यवस्थेची स्थिती कशी उध्वस्त झाली आहे, हे सर्वसामान्य माणूस रोज अनुभवतो आहे. कोरोनाची भीती एकीकडे आणि आपल्याला उपचारासाठी रुग्णालयात खाट तरी मिळेल का, याची धास्ती दुसरीकडे आणि घराबाहेर पडू नये तर रोजच्या जगण्याची भ्रांत अशा अवस्थेत सर्वसामान्य माणूस गेली सहा महिने  काढत आहे.

पैसा, पद, प्रतिष्ठा हे सारे कोरोनाने धुळीला मिळवले आहे. पैसे फेकूनही रुग्णालयात बेड मिळत नसल्याचे रोज अनुभवास येत आहे. राष्ट्रवादीचे नव्याने झालेले आमदार अमोल मिटकरी यांना असाच अनुभव आला. त्यांच्या मित्राच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर उपचारासाठी ज्याप्रकारे कसरत, धापवळ करावी लागली हे त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे लिहिले आहे.

मिटकरी यांनी हे लिहिले ते बरे केले. मुंबईपासून ते चंद्रपूरपर्यंत हाच अनुभव येतो आहे. उलट मिटकरी यांना फार उशिरा म्हणजे सहा महिन्यांनी हे अनुभवास मिळाले, याचेच आश्चर्य वाटते. कारण पुणे, मुंबईतील  कोणत्याही राजकीय पक्षाच्या साध्या कार्यकर्त्यापासून ते बड्या नेत्यापर्यंत आम्हाला बेड मिळवून द्या, यासाठीचे फोन रात्री-अपरात्री येतात. किमान गेली चार महिने तर हेच काम सुरू आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण मार्चमध्ये सापडला. पहिले दोन महिने बेड मिळण्याबाबत एवढी अवघड स्थिती नव्हती. आता मात्र परिस्थिती हाताबाहेर जात आहे.

कोणाला बेड मिळत नाही. बेड मिळाला तर तेथे सुविधा नाही, सुविधा असल्या तर डाॅक्टर नाहीत आणि डाॅक्टर असले तरी आॅक्सिजन नाही. एवढे करून उपचार झाले तर बिलाच्या रकमेने धक्का बसावा, अशी परिस्थिती आहे. मिटकरी यांना हे कळाले. ते सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळे मिटकरी यांनी आता आपल्य पक्षाच्या नेत्यांना, आरोग्यमंत्र्यांना हे सारे लक्षात आणून द्यावे. जनतेचे हाल किती होत आहेत, हे सांगावे. महाराष्ट्र हे देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत आघाडीवर आहे. या आकड्यांत आपलाही नंबर लागतो की काय, अशा भयावह अवस्थेत सामान्य माणसे रोजचा दिवस ढकलत आहेत.

मराठवाडा, विदर्भ येथील परिस्थिती तर पुण्या-मुंबईपेक्षा जास्त अवघड आहे. कारण तेथे आरोग्यव्यवस्थेचा आधीच बोजवारा उडालेला आहे. नव्याने आलेल्या आमदारांना आता जनतेचे प्राधान्यक्रम यातून लक्षात येतील. लोकांना आरोग्य आणि शिक्षण हे योग्य दरात मिळत किती गरज आहे, हे नव्या नेत्यांना, राज्यकर्त्यांना यातून कळेल. मिटकरींना उशिरा का होईना हा अनुभव आला. त्यांनी लिहिण्यापुरते थांबू नये. प्रत्यक्षात त्यांच्या अकोल्यातील पसिस्थिती कशी बदलता येईल याकडे आता लक्ष द्यावे. अन्यथा बोलाचा भात आणि बोलाची कढी, अशी ही मिटकरींची पोस्ट ठरेल. कारण आता केवळ भाषणे करण्याची जबाबदारी त्यांच्यावर नाही. संविधानिक पद त्यांना मिळाले आहे. काहीतरी बदल घडवून आणण्यासाठी त्यांची ही पोस्ट उपयुक्त ठरेल. 

काय म्हणाले मिटकरी आपल्या पोस्टमध्ये?

⁣⁣माझ्या मित्रांचे वडील काल कोरोना पॉझिटिव्ह आले हे समजताच त्यांनी मला संपर्क केला. संपर्क याकरिता केला की त्यांच्या वडिलांना 'आयसीयू'मध्ये अॅडमिट करायला बेड आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. ज्यांनी फोन केला ते आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम होते. अकोल्यामध्ये 'आयकॉन' आणि 'ओझोन' असे दोन हॉस्पिटल आहेत. मात्र, तिथे त्यांची व्यवस्था होऊ शकली नाही. पैसा उपलब्ध असतानासुद्धा अकोला जिल्ह्यात बेड उपलब्ध न होणे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.


सर्वानुमते निर्णय घेऊन एका खाजगी डॉक्टरच्या सल्ल्यावरून आम्ही पेशंटला नागपूरमध्ये 'वोकार्ट' हॉस्पिटलला (बेड व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याचे सांगितल्यावर) त्यांच्यावर विश्वास ठेवून एका सुसज्ज ॲम्बुलन्समध्ये रात्री एक वाजता मेडिकल ऑफिसर घेऊन नागपूरला पाठवले. रात्री साडेतीन वाजता पेशंट घेऊन ॲम्बुलन्स त्या हॉस्पिटलसमोर पोहोचली. मला रात्री साडेतीन वाजता मित्रांनी कॉल केला व ॲम्बुलन्स बाहेर उभी आहे. मात्र, आत बेड उपलब्ध नाहीत, असे डॉक्टर सांगताहेत असे सांगितले. पेशंट फक्त ऑक्सिजनवर आहे आणि खाजगी डॉक्टरच्या सांगण्यावरून आपण तिथपर्यंत पेशंट पाठवल्यानंतर सुद्धा समोरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत नसतील तर ही बाब फार गंभीर आहे. मी तितक्याच रात्री एका खाजगी कोविड सेंटरवर काही डॉक्टर मित्र व मी अनेक डॉक्टरच्या संपर्कात राहिलो. मात्र, रात्री साडेतीन वाजता कुठल्याच डॉक्टरांनी प्रतिसाद दिला नाही.


नागपूरमधील लता मंगेशकर हॉस्पिटल, किंग्ज वे हॉस्पिटल, ऑरेंज सिटी हॉस्पिटल, ऍलेक्सीज हॉस्पिटल, 'वोक्हार्ट हॉस्पिटल, सेव्हन स्टार हॉस्पिटल आदी हॉस्पिटलमध्ये, डॉ. मुंदडा, डॉ. मरार, डॉ. अग्रवाल, सुजाता मॅडम, कावेरी मॅडम आदी डॉक्टरांशी संपर्क केला. मात्र, या सर्व श्रीमंत डॉक्टरांपैकी कोणीही कुठलाही कसलाही प्रतिसाद दिला नाही.


नंतर वर्धा, सावंगी मेघे याठिकाणी फोन केले. पेशंटला परत इथे आणावे का?, तर अकोल्यातील सर्व दवाखान्यात फोन केले. सरकारी दवाखाने हाउसफुल, प्रायव्हेट दवाखाने हाउसफुल, नागपुरमधील दवाखाने हाउसफुल, पेशंटकडे स्वतःच्या गाड्या आहेत. अनेक मोठ्या लोकांशी संपर्क आहेत. असे असतांनासुद्धा पेशंटला एक व्हेंटिलेटर व बेड उपलब्ध नसणे हे फार धक्कादायक आहे. अखंड प्रयत्नानंतर शेवटी सरकारी दवाखान्यातच सद्यस्थिती पेशंटला भरती करावे लागले आहे. (विचार करण्यासारखी बाब ही की मी आमदार असतांना व पेशंट सुद्धा आर्थिक सक्षम असतांना जर प्रायव्हेट डॉक्टर्स असा जीवघेणा खेळ खेळून, रात्री फोन बंद करून प्रतिसाद देत नसतील तर सामान्य माणसाचं जगणं म्हणजे हा एक फक्त खेळ आहे?, असे समजायचे का?? )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com