तुकाराम मुंढेंची रुजू होण्याआधीच पुन्हा बदली! मंत्री गुलाबरावांनी नवा अधिकारी शोधला - tukarm mundhe transfers before joining in MJP as minister happy with other officer | Politics Marathi News - Sarkarnama

तुकाराम मुंढेंची रुजू होण्याआधीच पुन्हा बदली! मंत्री गुलाबरावांनी नवा अधिकारी शोधला

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

तुकाराम मुंढे यांची ही चौदावी बदली असेल.. 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा घोळ काही संपत नसून काल एका अधिकाऱ्याच्या बदलीचे चार तासांत दोन आदेश काढण्याचा प्रकार झाला. आता नागपूर पालिका आयुक्त पदावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सचिवपदी नियुक्ती केलेल्या तुकाराम मुंढे यांची ती पण बदली रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मुंढे हे आता विनापदाचे असून त्यांच्यासाठी नवीन पोस्ट शोधली जात आहे. 

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. ते पण स्वभावाने तिखट आहे. त्यांचा आणि मुंढे यांचा सामना कसा रंगणार, याची उत्सुकता होती. मात्र मुंढे हे तेथे रूजू होण्याच्या आधीच त्यांची तेथील बदली रद्द झाली.. मुंढे हे कोरोनातून दोन दिवसांपूर्वीच बरे झाले आहेत. त्यामुळे ते लगेच कार्यभार स्वीकारणार नव्हते. तो स्वीकारायच्या आधीच तेथे इतर अधिकारी नेमण्यात आले.

मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्य़भार देण्यात आला आहे. निंबाळकर हे जळगावचे जिल्हाधिकारी होते. त्यामुळे त्यांच्या कारभाराची गुलाबराव पाटील यांना पूर्वकल्पना आहे. परिणामी मुंढे यांच्याऐवजी पाटील यांना निंबाळकर हे पसंत पडले असण्याची शक्यता आहे. मुंढे हे प्राधिकरणात आल्यानंतर या दोघांत वादाच्या ठिणग्या पडण्याची शक्यता व्यक्त झाल्यानंतर पाटील यांनी माझे आणि मुढे यांचे काम पाणी पुरविण्याचे आहे. त्यामुळे आमच्या दोघांत आग कशी लागेल, असा सवाल करत मुंढेंच्या नियुक्तीला विरोध नसल्याचे स्पष्ट केेले होते. प्रत्यक्षात त्यांनी मुंढे यांना टाळले तर नाही ना, अशी चर्चा आता मंत्रालयात आहे. 

 एम. जे. प्रदीप चंद्र यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर या रिक्त पदावर करण्यात आली आहे. दुसरीकडे ई रवींद्रन यांची नियुक्ती सह विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई या पदावर करण्याचे आजच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती विशेष कार्य अधिकारी धारावी पुनर्वसन प्रकल्प मुंबई या रिक्त पदावर काल दुपारी करण्यात आली होती. या नियुक्तीचा आदेश चार तासांत फिरवून त्यांना म्हाडाची जबाबदारी देण्यात आली आहे.  

विवेक जॉन्सन अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांची नियुक्ती प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा आणि साहाय्यक जिल्हाधिकारी भंडारा उपविभाग या पदावर नियुक्ती

अमित सैनी सहायक विक्रीकर आयुक्त मुंबई यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र मेरीटाईम मंडळ मुंबई या रिक्त पदावर 

श्री दीपक कुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, वाशिम, यांची नियुक्ती जिल्हाधिकारी गोंदिया या पदावर 

एस राममूर्ती, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, नागपूर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी बुलढाणा या रिक्त पदावर 

प्रशांत नारनवरे यांची नियुक्ती आयुक्त समाजकल्याण कल्याण, पुणे, या पदावर (श्री प्रवीण दराडे यांच्या जागी)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख