राज्यपाल कोश्यारी यांची सूचना, "जून-जूलैमध्ये वाढणाऱ्या कोरोनाच्या आव्हानासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा" - Suggestion from Governor Koshyari, "Keep the health system ready for the growing corona challenge in June-July" | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यपाल कोश्यारी यांची सूचना, "जून-जूलैमध्ये वाढणाऱ्या कोरोनाच्या आव्हानासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा"

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 21 मे 2020

कोरोना संकटाचा मुकाबला करताना अन्य रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याची सूचना राज्यपालांनी  केली.

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहेत. जून, जुलै महिन्यातील कोरोनाच्या प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्याची सूचना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली. कोरोनाबाबत राज्याच्या विविध विभागाच्या पूर्व तयारीचा एका उच्च स्तरीय बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी या सूचना राज्यपाल कोश्यारी यांनी दिल्या.

येत्या जून व जूलै महिन्यातील कोरोना बाधितांची संभाव्य संख्या विचारात घेऊन संपूर्ण राज्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली. कोरोना संकटाचा मुकाबला करताना बिगर कोरोना रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

मुंबईतील कंटेनमेंट क्षेत्रासाठी काय उपाय योजना करीत आहे, याची राज्यपालांनी संबधित विभागांकडून माहिती घेतली. राज्यात एकूण वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, आरोग्य सेवक, रूग्णालयातील उपलब्ध खाटा यांची एकत्रित माहिती देणारा डॅशबोर्ड तयार करण्याची राज्यपालांनी यावेळी सूचना केली.

कोरोना विरुध्दच्या लढाईत आघाडीवर राहून कार्य करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलिस यांना प्रोत्साहन देण्याबाबत सरकारने विचार करावा, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. राज्यातून मजूरांचे स्थलांतर व स्थलांतरितांसाठी सूरु केलेल्या शिबिरांची सद्य:स्थिती काय आहे, याबाबत देखिल राज्यपालांनी आढावा घेतला.

यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले.  बैठकीला मुख्य सचिव अजय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सीतराम कुंटे, मनोज सौनिक, नितीन करीर व प्रदीप व्यास, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, सरकारच्या विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीला मिलिंद नार्वेकर हजर 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोलविलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले. सेनानेते मिलिंद नार्वेकर या बैठकीला हजर होते. राज्यपालांनी निमंत्रण देऊनही मुख्यमंत्री ठाकरे हे अनुपस्थित राहिले. पण त्यांचे दूत म्हणून नार्वेकर यांनी हजेरी लावली. नार्वेकर यांच्याकडे तसे थेट शासकीय पद नाही. मात्र  तरीही प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावून गेली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांनी राज्यपालांची बुधवारी भेट घेऊन ठाकरे सरकार कोरोनाची परिस्थिती नीट हाताळत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर राज्यपालांनी बैठक बोलविली. अर्थात या आधी पण राज्यपालांनी कोरोनाच्या परिस्थितीचा राजभवनावर आढावा घेतला होता.  त्या वेळी मुख्यमंत्र्यासोबत नार्वेकर हजर होते. मात्र स्वतः न येऊन नार्वेकरांकडे कोणतेही पद नसताना त्यांना राजभवनावर पाठविण्यामागचे कारण अनेकांना कळाले नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख