`कोविड' भरतीत बेरोजगारांकडून एक महिन्याचा पगार डिपॉझिट!

कोविड-19 प्रतिबंधासाठी कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतली आहे. मात्र, यासाठी त्या बेरोजगार तरुणांचा एक महिन्याचा पगार आधीच कपात करुन घेण्याची अजब अट घातली आहे.
thane municipal corporation demands one month salary advance from contractual labour
thane municipal corporation demands one month salary advance from contractual labour

ठाणे : कोविड -१९ प्रतिबंधासाठी कंत्राटी वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या भरतीत निवड झालेल्या पात्र बेरोजगार तरुणांकडून एक महिन्याचा पगार डिपॉझिट घेण्याची अट ठाणे महापालिकेने टाकली आहे. या प्रकारावर कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी टीकास्त्र सोडले असून, अशी अट ठेवणारे ठाणे महापालिकेचे अधिकारी आहेत की 'वेठबिगार'वाले सावकार, असा सवाल केला आहे.

कोविड-१९ मध्ये जगभरातील आरोग्य यंत्रणेचा कस लागला असून, ठाण्यातही रुग्णांचा आकडाही दोन हजारांच्या पल्याड पोचला आहे. या आपत्तीत दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असताना, जीव धोक्यात घालून कार्य करणाऱ्या डॉक्टर, नर्स यांच्यासह वैद्यकिय कर्मचाऱ्यांवर वाढता ताण आहे. अत्यावश्यक सेवेतील कार्यासाठी अधिकाधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र, त्याचं सोयरसुतक ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नसावं, अशी खंत आमदार निरंजन डावखरे यांनी `ट्वीटर'द्वारे व्यक्त केली.

ठाणे महापालिकेने कोविड प्रतिबंधासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी जाहिरात देऊन मुलाखती सुरू केल्या. डॉक्टर, नर्स, आया, वॉर्डबॉय, तांत्रिक सेवेतील कर्मचारी, डीटीपी ऑपरेटर अशा १ हजार ३७५ पदांसाठी भरती होत आहे. पात्र उमेदवारांना तत्काळ सेवेत घेण्याची गरज आहे. मात्र, रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांपुढे एक संतापजनक अट टाकण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांना सेवेत रुजू होण्यापूर्वी एक महिन्याचे मानधन अनामत रक्कम म्हणून ठेवायचे आहे. त्यावर कोणतंही व्याज देणार नसल्याचेही महापालिकेने जाहिरातीत म्हटले आहे. 

या कर्मचाऱ्यांच्या अनामत रक्कमेवर महापालिकेची तिजोरी भरणार का, असा सवालही आमदार डावखरे यांनी केला. तसेच अशी अट ठेवणारे ठाणे महापालिकेचे अधिकारी आहेत का `वेठबिगार'वाले सावकार असा प्रश्न केला आहे. दरम्यान, पात्र उमेदवारांना तत्काळ नियुक्तीपत्रे देऊन डिपॉझिटची अट न ठेवता रुजू करावे, अशी मागणी आमदार डावखरे यांनी आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com