किमान आव्हाडांचे तरी ऐका : ठाण्याच्या भाजप नगरसेवकाची मागणी  - Thane BJP Corporator Criticizes Shivsena over Dam Purchase Issue | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल
बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंचे नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. त्यामुळे ही निवडणुक प्रक्रियाच रद्द करावी, अशी मागणी निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

किमान आव्हाडांचे तरी ऐका : ठाण्याच्या भाजप नगरसेवकाची मागणी 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

ठाणे महापालिकेने स्वतंत्र धरण उभारण्याची २००३ मध्ये सुवर्णसंधी गमावल्यानंतर झोपी गेलेल्या शिवसेनेला आता पुन्हा जाग आली आहे, अशी खरमरीत टीका भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली. २००३ मध्ये स्वतंत्र धरण नाकारल्यानंतर जुलै २०१६ मध्ये पुन्हा स्वतंत्र धरणाच्या सत्ताधारी शिवसेनेने डरकाळ्या फोडल्या होत्या; मात्र आता पुन्हा चार वर्षांनंतर धरणासाठी 'फुकाची बडबड' केली जात असून कृती शून्य आहे, अशी टीका नारायण पवार यांनी केली

ठाणे : कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची राजवट असताना शाई धरणाबाबतची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची सूचना शिवसेनेने नाकारली होती. आता महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आले आहेत. सध्या एकाच मंत्रिमंडळात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व जितेंद्र आव्हाड मंत्री आहेत. त्यामुळे आता तरी मंत्री आव्हाड यांची सूचना ऐकावी, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.

ठाणे महापालिकेने स्वतंत्र धरण उभारण्याची २००३ मध्ये सुवर्णसंधी गमावल्यानंतर झोपी गेलेल्या शिवसेनेला आता पुन्हा जाग आली आहे, अशी खरमरीत टीका भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली. २००३ मध्ये स्वतंत्र धरण नाकारल्यानंतर जुलै २०१६ मध्ये पुन्हा स्वतंत्र धरणाच्या सत्ताधारी शिवसेनेने डरकाळ्या फोडल्या होत्या; मात्र आता पुन्हा चार वर्षांनंतर धरणासाठी 'फुकाची बडबड' केली जात असून कृती शून्य आहे, अशी टीका नारायण पवार यांनी केली.

राज्यात कोठे धरणे असावीत, याबाबत चितळे किंवा गोडबोले समितीने अहवाल दिला होता. त्या वेळी ठाणे ही नगर परिषद असल्याने शाई धरण मुंबईला देण्याचे ठरवण्यात आले होते; मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळात हे धरण ठाण्यासाठी राखीव ठेवण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही धरणाला मंजुरीही दिली होती. त्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही शाई धरण विकत घ्यावे, असे सत्ताधारी शिवसेनेला सुचवले होते. 

त्या वेळी फक्त ४५० कोटी रुपयांत धरण मिळत होते; तर या धरणाच्या सर्वेक्षणासाठी ठाणे महापालिकेने २००७ मध्ये ७१ लाख रुपयांचा निधीही मंजूर केला होता; मात्र ठाणे महापालिकेने धरणाबाबत गांभीर्याने भूमिका घेतली नव्हती. त्यानंतर एका अर्थसंकल्पात २५  कोटी रुपयांची तरतूदही केली होती; मात्र धरण घेण्याऐवजी एमएमआरडीएने धरणाचे काम करण्याचे सुचवले होते, याकडे भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख