वसई : वसई - विरार शहर महापालिकेच्या निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात प्रारूप याद्या तयार करण्यात आल्या असून 9 लाख 47 हजार मतदार नोंदणी करण्यात आली आहे. येत्या 23 फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना सूचना व हरकत नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने वसई - विरार महापालिकेच्या सार्वत्रिक निवणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. फक्त निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर केली नाही. वसई - विरार शहर महापालिका क्षेत्रात एकूण 115 प्रभाग आहेत. प्रारूप याद्या जाहीर केल्याने अनेक पक्षातील इच्छुक उमेदवार, नागरिक व पक्षातील मंडळींनी याद्या घेण्यासाठी तयारी सुरु केली आहे. आपल्या प्रभागातील लोकसंख्या व मतदार किती याची चाचपणी यानिमित्ताने करण्यासाठी धडपड होणार आहे. त्यानंतर मतदारांना गोंजारण्याचे काम केले जाईल. प्रारूप मतदार याद्यांवर आलेल्या हरकती व सूचना पाहून पुढे सुधारणा करून नंतर 3 मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये निवडणुकीची धामधूम होण्याची शक्यता आहे.
समाजमाध्यमांचा वापर
प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होताच समाजमाध्यमवर अनेक पक्षीय समूहात मतदार याद्या इच्छुक उमेदवारांनी वसई - विरार शहर महापालिकेतून सकाळी 10ते दुपारी 3 वेळेत जाऊन घ्याव्यात तसेच हरकती असल्यास नोंदविण्यात याव्यात असे संदेश लागले आहेत.त्यामुळे महापालिकेत इच्छुकांची गर्दी होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, महापालिकेने काम सुरु केले आहे. प्रारूप याद्या, हरकती सूचना, अंतिम याद्या असा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यातील प्रारूप याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.
प्रेमसिंग जाधव, सहाय्य्क आयुक्त, निवडणूक विभाग
Edited By - Amit Golwalkar

