सरकार-महापालिकेतील समन्वयाअभावी रुग्णांचे मृत्यू : प्रवीण दरेकरांचा आरोप

ठाणे शहर व जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात सरकार व ठाणे महापालिका पूर्णपणे अपयशी ठरली आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे
No Cooperation between Thane Corporation and State Government Alleges Pravin Darekar
No Cooperation between Thane Corporation and State Government Alleges Pravin Darekar

ठाणे  : कोरोनाचा ठाणे शहरासह जिल्ह्यात वाढलेला प्रादुर्भाव रोखण्यास राज्य सरकार व महापालिका जबाबदार आहे. बेड, ऑक्‍सिजन आणि अॅम्ब्युलन्स नसल्यामुळे झालेल्या मृत्यूला प्रशासनच जबाबदार आहे. कोरोना नियंत्रणासाठी दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असून, प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे अनेक मृत्यू घडले आहेत,असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या ठाणे शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा केला. माजिवडा येथील ग्लोबल हॉस्पिटल, भाईंदरपाडा येथील क्वारंटाईन सेंटर ला भेट दिल्यानंतर त्यांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. या वेळी आमदार संजय केळकर,  भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, भाजपचे गटनेते संजय वाघुले, नगरसेवक नारायण पवार, मिलिंद पाटणकर, सुनेश जोशी मनोहर डुंबरे,, कृष्णा पाटील आदी उपस्थित होते.

ठाणे शहर व जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात सरकार व ठाणे महापालिका पूर्णपणे अपयशी ठरली आहे, असे दरेकर या बैठकीनंतर म्हणाले. ''या दोन्ही यंत्रणांत समन्वय नाही. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहेत. त्यात प्रशासनाचा बेजबाबदारपणा व आरोग्य व्यवस्थेतील हेळसांडही कारणीभूत आहे. अनेक ठिकाणी बेड, ऑक्‍सिजन आणि अॅम्ब्युलन्स नसल्यामुळे मृत्यू झाले. त्याला प्रशासनाचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे,'' असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

ठाणे महापालिकेने चांगल्या पद्धतीने हॉस्पिटल उभारले. त्यात बेडबरोबरच सुंदर डेकोरेशन केले आहे. मात्र, डॉक्‍टर व नर्स उपलब्ध नसल्यामुळे हॉस्पिटलचा उपयोग काय?, असा सवाल त्यांनी केला. नर्सची आवश्‍यकता असताना केवळ ७० नर्सच्या साह्याने हॉस्पिटल कसे सुरू राहणार, असे विचारत करीत दरेकर यांनी तत्काळ मनुष्यबळ उपलब्ध करण्याची मागणी केली. सिव्हील हॉस्पिटलमध्ये केवळ २० व्हेंटिलेटर असून तिथे प्रत्यक्षात 60 व्हेंटिलेटरची गरज आहे, याबाबत राज्य सरकारकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

...तर आंदोलन करु
ठाणे शहरातील परिस्थिती आठ दिवसांत आटोक्‍यात आली नाही तर भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा दरेकर यांनी यावेळी दिला. अवाजवी बिले आकारून लूट करणाऱ्या हॉस्पिटलांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही दरेकर यांनी केली.

बारा मागण्या
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा कारभार सुधारावा. पुरेशा ऑक्‍सिजन सिलिंडरची व्यवस्था करावी. ५५ वर्षांवरील शिक्षकांना नियुक्‍त्या देऊ नयेत. जवाहरबाग स्मशानभूमीबरोबरच अन्य चार स्मशानभूमीत मृतदेहांचे दहन करावे. आवश्‍यक औषधांची खरेदी करावी अशा बारा मागण्या भाजपच्या वतीने करण्यात आल्याची  माहिती जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com