पिपरी : ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरुद्ध ईडीने केलेल्या कारवाईचे भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पूत्र आमदार नीतेश राणे यांनी जोरदार समर्थन केलं आहे. ठाण्याचे सरनाईक आणि मुंबईचे वायकर यांचं भुयारी गटार कलाननगरकडे जात असल्याचे सांगत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनाही या प्रकरणात ओढले.
ईडी,सीबीआय या देशातील जबाबदार संस्था असून त्यांना काही चुकीचे वाटले असेल म्हणून ही कारवाई झाली असेल,अशी प्रतिक्रिया त्यांनी सरनाईक यांच्यावर ईडीने टाकलेल्या छाप्यासंदर्भात दिली. गैरप्रकार झाला असेल, तर कारवाई झालीच पाहिजे, असे सांगत त्यांनी या कारवाईचे समर्थनही केलं. या कारवाईचे फटाके कुठपर्यंत फुटतात, ते लवकर दिसेलच,असे ते म्हणाले.
सरनाईक आणि वायकर हे भुयारी गटार असून त्यामार्फत ईडीने खोलात जाऊन तपास केला,तर ते कलानगरला पोचतील,असा खळबळजनक दावा त्यांनी केला.सरनाईक हा एक मुखवटा असून त्यामागील मुख्य कलाकार हा कलानगरमध्ये (ठाकरेंचं मातोश्री निवासस्थान असलेलं मुंबईच्या वांद्रे पूर्व येथील ठिकाण)बसला आहे,अशी फटकेबाजी त्यांनी केली.तिथे सकाळी गेलात, तरी सारी रहस्य बाहेर येतील,असेही ते म्हणाले.
नारायण राणे यांनी, मात्र या प्रकरणावर थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. सरनाईक काय साधूसंत नाहीत, असे तिखट वक्तव्य,मात्र त्यांनी केलं. ईडीची ही कारवाई योग्य की अयोग्य हे सांगा, मग प्रतिक्रिया देईन,असे ते म्हणाले आहेत.
प्रताप सरनाईक काही साधु-संत नाहीत, राणेंचा टोला.. https://t.co/pwrPZ4v69F
— Sarkarnama (@SarkarnamaNews) November 24, 2020
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्यानंतर आगपाखड करून आपल्याकडे भाजपच्या शंभर जणांची यादी असल्याचा कांगावा करणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी ती यादी सक्त वसुली संचालनालयाकडे द्यावी. मी स्वत: कारवाई करायला भाग पाडेन, असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. ज्यांची कोणतीही चूक नाही. त्यांनी कोणत्याही चौकशीला घाबरण्याचे कारण नाही. वस्तुस्थितीपासून दूर पळण्यासाठी या विषयावरून खासदार राऊत यांनी कांगावा करू नये, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar

