ठाण्यातील मालमत्ता करावरून भाजप, मनसे आक्रमक; शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

ठाण्यात शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना असे बोलले जाते. मात्र कोणत्याही आश्‍वासनाची पूर्तता शिवसेनेकडून होत नाही. निवडणुकीत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना अजूनही करमाफी देण्यात आलेली नाही. नागरिकांची मते घेतली आणि आता त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. याविरोधात भाजपच्या वतीने चळवळ उभी केली जाणार आहे.
MNS and BJP Aggressive Against Thane Municipal Tax
MNS and BJP Aggressive Against Thane Municipal Tax

ठाणे  : शहरातील ५०० चौरस फुटांपर्यंत घराचा मालमत्ता कर माफ करण्यासंदर्भात शिवसेनेने महापालिका निवडणुकीच्या वेळी घोषणेची, भाजपने बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेला आठवण करूरुन दिली आहे; तर मनसेने थाळीनाद आंदोलन करून ही मालमत्ता कराची माफी कधी मिळणार, हा प्रश्‍न उपस्थित केला आहे. मालमत्ता कराच्या माफीवरून भाजप आणि मनसेने आता सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडले आहे.

शहरातील विविध भागांत भाजपने 'क्‍या हुआ तेरा वादा' असा बॅनरद्वारे सवाल करीत मालमत्ता करमाफीवरून शिवसेनेने सुरू केलेल्या टाळाटाळीकडे ठाणेकरांचे लक्ष वेधले आहे. कोरोनाच्या आपत्तीत सापडलेल्या लाखो ठाणेकर कुटुंबांना मालमत्ता कर व पाणीपट्टीतून दिलासा देण्यास ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने नकार दिला आहे. महापालिकेचे उत्पन्न घटणार असल्याचे कारण दाखवून, शिवसेनेच्या नेत्यांकडून सातत्याने टाळाटाळ केली जात आहे. 

मात्र, २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने जाहीर केलेल्या वचननाम्यात ५०० चौरस फुटांपर्यंत घरांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते; परंतु आता सत्ता मिळाल्यानंतर वचननाम्याचा सोयीस्कर विसर पडून मालमत्ता कर माफ करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, याकडे भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांनी लक्ष वेधले आहे.

मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिका मुख्यालयाच्या बाहेर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. मनसेच्या या आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती, त्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

२०१२ च्या वचननाम्याचाही पंचनामा करणार
आज केवळ थाळीनाद आंदोलन करण्यात आले आहे. करमाफीचे २०१७ च्या निवडणुकीत दिलेले वचन कुठे गेले ? टोल मुक्ती का झाली नाही ? घनकचरा करात व्यापाऱ्यांना करसवलत का देण्यात आली नाही. यापुढे जोपर्यंत दिलेले वचन शिवसेना पूर्ण करणार नाही तोपर्यंत नवीन वचन देऊन नये, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल. तसेच या पुढे आम्ही सत्ताधारी शिवसेनेच्या २०१२ च्या वचननाम्याचाही पंचनामा करणार असल्याचा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. त्याचवेळी महापालिकेत २४ नगरसेवकांचे बळ असताना भाजपचे नेते या विषयावर केवळ बॅनरबाजी करून का स्वस्थ बसत आहेत, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

करमाफीच्या मुद्द्यावरून भाजप चळवळ उभारणार
ठाण्यात शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना असे बोलले जाते. मात्र कोणत्याही आश्‍वासनाची पूर्तता शिवसेनेकडून होत नाही. निवडणुकीत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना अजूनही करमाफी देण्यात आलेली नाही. नागरिकांची मते घेतली आणि आता त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. याविरोधात भाजपच्या वतीने चळवळ उभी केली जाणार आहे.
Edited By  - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com