'या' महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीला स्थगिती

मिरा-भाईंदर महापालिकेत साडे तीन वर्षांनंतर करण्यात आलेल्या सहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मिरा भाईंदरचे स्थानिक नितेश मुणगेकर यांनी अॅड. संदेश पाटील यांच्यातर्फे या नियुक्‍त्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती
High Court Stays Co-opted Corporators Appointment in Mira Bhayander
High Court Stays Co-opted Corporators Appointment in Mira Bhayander

भाईंदर  : मिरा-भाईंदर महापालिकेत साडे तीन वर्षांनंतर करण्यात आलेल्या सहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

याबाबतचा ठराव पालिकेच्या महासभेने ७ डिसेंबर रोजी पास केला होता. या ठरावावर राज्य सरकारने ८ डिसेंबर रोजीच स्थगन आदेश आणला होता. त्यावर सुनावणी होण्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयानेच त्यांना स्थगिती दिल्याने सत्ताधारी भाजपची घाई व ही प्रक्रियाच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

मिरा भाईंदरचे स्थानिक नितेश मुणगेकर यांनी अॅड. संदेश पाटील यांच्यातर्फे या नियुक्‍त्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत अॅड. पाटील यांनी सांगितले की, नियमानुसार समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, ज्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा महापालिकेस होऊ शकतो व जे किमान पाच वर्षांपासून पालिका क्षेत्रात कार्यरत आहेत असे वकील, प्राध्यापक, सीए, उपायुक्त अधिकारी व स्वंयसेवी संस्थांचे सदस्य यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती होणे आवश्‍यक आहे; मात्र मिरा भाईंदर पालिका आयुक्तांनी स्वयंसेवी संस्था या श्रेणीतून नियुक्ती करताना उमेदवाराच्या कागदपत्रांची चॅरिटी कमिशरकडून तपासणी न करताच परस्पर सहा उमेदवारांचे अर्ज राजकीय दबावामुळे मंजूर केले. ते पूर्णपणे बेकायदेशीर व अवैध आहेत.

तसेच आयुक्तांनी राजकीय दबावामुळे नियुक्तीसंदर्भातील जाहिराती लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध न करता केवळ स्थानिक दैनिकात जाहिरात दिल्या. त्यामुळे अनेक सक्षम उमेदवार माहितीअभावी वंचित राहिल्याने संपूर्ण प्रक्रियाच संशयाच्या जाळ्यात अडकल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विश्‍वासू व अत्यंत जवळचे समजले जाणारे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या कारभारावरून नाराज होत शिवसेनेत सामील झालेल्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक घोषित न केल्यामुळे राज्य सरकारकडून स्थगन आदेश आणला होता. मात्र, न्यायालयाच्या निकालामुळे त्याची सुनावणी लांबण्याची शक्‍यता आहे.

नियुक्‍त्यांवरून राजकारण!
स्वीकृत नगरसेवक नियुक्तीसाठी भाजपतर्फे सोहनसिंग राजपूत, अनिल भोसले, अजित पाटिल, भगवती शर्मा व शिवसेनेच्या वतीने विक्रम प्रताप व कॉंग्रेसने अॅड. एस. ए. खान या सहा जणांना उमेदवारी दिली होती. भाजपचे सोहनसिंग आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन राजस्थानात आपल्या गावी निघून गेल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे उमेदवार विक्रम प्रताप यांचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांशी खटके उडाल्याने त्यांना ठेकेदार दाखवून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याची चर्चा आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com