Corona Patients Increased In Thane District duting Fresh Lock Down | Sarkarnama

ठाणे जिल्ह्यात लाॅकडाऊनच्या सतरा दिवसात वाढले ३२ हजार नवे रुग्ण

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 22 जुलै 2020

२ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधी रुग्णांची संख्या ३६ हजार ५६७ होती. त्यात १९ जुलैपर्यत करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमध्ये  कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ३२ हजार ६२३ रुग्णांची वाढ झाल्याने एकूण बाधितांची संख्या थेट सत्तर हजारच्या घरात जाऊन पोहोचली.

ठाणे :  ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव  रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच महानगर पालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात देखील २ जुलै ते १९ जुलै या काळात लाॅकडाऊन जारी करण्यात आला होता. या लाॅकडाऊनमुळे रुग्णाच्या संख्या आटोक्‍यात येईल, अशी अपेक्षा महापालिका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली होती. मात्र, या सतरा दिवसांच्या लाॅकडाऊनच्या काळात चक्क ३२ हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. सुमारे ८००  जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे, अशी माहिती शासकीय आकडेवारीवरून समोर आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ठाणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर पेक्षा सर्वाधिक रुग्णांची नोंद झाल्याचे दिसून येत आहे.

राज्याप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही मागील तीन ते चार महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लाॅकडाऊन करण्यात आला होता. मात्र, जून महिन्यात अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी  लाॅकडाऊन शिथिल करुन अनेक आस्थापने सुरु करण्यात आली. यामुळे नागरिकांची रस्त्यांवर व बाजारपेठांमध्ये गर्दी वाढळी. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनासह महापालिका प्रशासनाने सर्वत्र पुन्हा लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

त्यानुसार जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर आणि भिवंडी या प्रमुख महापालिकांसह ग्रामीण भागात देखील २ जुलै ते 19 जुलै या काळात लाॅकडाऊ करण्यात आला. या लाॅकडाऊनमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होईल व कोरोनाची साखळी तुटेल, अशी शक्‍यता व्यक्त करण्यात येत होती. प्रत्यक्षात मात्र, याच लाॅकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे लाॅकडाऊन नेमका कशासाठी करण्यात आला, असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.

२ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधी रुग्णांची संख्या ३६ हजार ५६७ होती. त्यात १९ जुलैपर्यत करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमध्ये  कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ३२ हजार ६२३ रुग्णांची वाढ झाल्याने एकूण बाधितांची संख्या थेट सत्तर हजारच्या घरात जाऊन पोहोचली.

सर्वाधिक रुग्ण  कल्याण डोंबिवलीत 
कल्याण- डोंबिवली महापालिकेत क्षेत्रात २ जुलै रोजी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७ हजार ४८५ इतकी होती. त्यात नव्या लाॅकडा ऊनच्या च्या १७  दिवसांच्या कालावधीत यामध्ये सर्वाधिक ८ हजार ८४९ ने वाढ झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १६ हजार ३३४ एवढी झाली आहे. त्यापाठोपाठ ठाणे महापालिका क्षेत्रात ६ हजार ४९८ रुग्णांची भर पडली असून बाधितांची संख्या १६ हजार २८ वर पोहोचली आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची ४ हजार ६२४ ने वाढ झाल्याने बाधितांची संख्या ११ हजार ७१२ झाली. तर, उल्हानगर पालीकाक्षेत्रात ३ हजार ६१० रुग्णांची वाढ झाली असून  रुग्णसंख्या ५ हजार ७६६ झाली आहे.

(Edited By - Amit Golwalkar)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख