वाचाळवीर नेते, मुका आणि बोंब ! 

काही नेते असे आहेत, की स्वपक्षातील असो की दुसऱ्या, ते कधीही त्यांचे समर्थन करीत नाहीत.
Pudhari.jpg
Pudhari.jpg

अहमदनगर : वाचाळवीरांमध्ये आता विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचाही समावेश झाला आहे. खरं तर सर्वांनीच वाचाळवीरांचा निषेध करायला हवा; पण तसे होत नाही. जो नेता वाचाळवीर आहे, त्या पक्षाचे नेते त्याचे समर्थन करतात, हे दुर्दैव ! काही नेते असे आहेत, की स्वपक्षातील असो की दुसऱ्या, ते कधीही त्यांचे समर्थन करीत नाहीत. त्यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव घ्यावे लागेल. Talkative leader, kiss and bomb!

मिका सिंग याचे मुका प्रकरण गाजले होते. त्या घटनेनंतर त्याचा सर्वत्र निषेधही करण्यात आला होता. वास्तविक, हे काही एक प्रकरण नाही. महिलांविषयी बेजबाबदारपणे वादग्रस्त विधाने करणारे भले भले नेते आतापर्यंत होऊन गेले. राजकीय नेत्यांची जीभ घसरली नाही असा एकही पक्ष अपवाद नाही. सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निषेध सुरू आहे. 

हेही वाचा...

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी निघोजमध्ये तर दरेकरांचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. आम्ही तुमचे गाल रंगविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तमाशा कलावंत सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाविषयी इतक्या खालच्या स्तरावर टीका करण्याची गरज होती का, हा प्रश्न आहे. येथे लोकशाही आहे. 

कोणी कोणत्याही पक्षात प्रवेश करू शकतो. आजपर्यंत दोन्ही कॉंग्रेसमधून भाजपमध्ये काय कमी लोकांनी प्रवेश केला आहे का ? म्हणून त्यांच्याविरोधात कोणी खालच्या स्तरावर टीका केली नाही. शिवसेनेतून कॉंग्रेस, राष्ट्रवादीमध्येही काही नेते गेले होते. त्यावरूनही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याच होत्या! ज्येष्ठ नेते छगन भुजबळ असतील किंवा नारायण राणे असतील, शिवसेनेने त्यांना लक्ष्य केले नाही असे नाही. तसेच या दोघांनीही शिवसेनेवर सडकून टीका केली होती. राजकारणात ‘आयाराम- गयाराम’ ही प्रक्रिया सुरूच असते. त्यामध्ये विशेष असे काही नाही. 

मुद्दा हा आहे, की राजकारणातीलच नव्हे, तर कोणत्याही महिलांविषयी विधान करताना थोडं संयमानं बोललं पाहिजे. उचलली जीभ लावली टाळ्याला, असे होता कामा नये. काही वेळा मुद्दाम वाद निर्माण करण्यासाठी किंवा लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठीही वादग्रस्त विधान केली जातात. मात्र, महिलांविषयी बोलताना आपल्या घरातही आयाबहिणी आहेत याचे भान का राहत नाही? 

हेही वाचा...

राष्ट्रवादी रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे असे विधान दरेकरांनी केल्याने वादाला फोडणी मिळाली. खरं तर दरेकरांसारख्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीची जीभ घसरायला नको होती. सुरेखा पुणेकर या एक कलावंत आहेत. तमाशा, लावणी महाराष्ट्राचा ठेवा आहे. दरेकरांमुळे राज्यातील हजारो तमाशा कलावंतांच्या भावना दुखावल्या आहेत. कोणताही समाज असो, की जात, धर्म, महिला; त्यांच्याविषयी बोलताना थोडं भान राखायलाच हवं. 

राज्यात मराठा समाजाचे मूक मोर्चे शांततेत निघत होते. सर्वांनीच त्यांचे स्वागत केले होते. मात्र, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’त ‘मुका मोर्चा’ असे व्यंगचित्र प्रसिद्ध करून शिवसेनेने समाजाचा रोष ओढवून घेतला होता. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चूक लक्षात घेऊन मराठा समाजाविषयी आपल्या मनात आदर असल्याचे जाहीरपणे सांगितले. चूक मान्य केली. हे त्यांचे मोठेपण म्हणावे लागेल. 

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त बोलणारा छिंदम असेल, भारतीय जवानांविषयी बोलणारे पंढरपूरचे प्रशांत परिचारक असतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी केंद्रीय मंत्री काय म्हणाले, हे राज्याला माहीतच आहे. असे हे वाचाळवीर नेते असले, तरी आणखी बरेच नेते तसे आहेत. त्यांची यादी द्यायची झाली, तर पान पुरणार नाही. महाराष्ट्राप्रमाणे वाचाळवीरांची संख्या दिल्लीतही कमी नाही. 

वाचाळवीरांना वाटते, की आपण काही बोललो तर लोक ते सगळं सहन करतात. मात्र, तसे होत नाही. लोक त्याचा निषेध करतात. शिवराळ भाषेत बोलणे किंवा शिव्या देणे काही अवघड नसते. मात्र, सुसंस्कृत भाषेत कोपरखळी मारता आली पाहिजे, टीका केली पाहिजे. त्याला म्हणी, उत्तम शब्दप्रयोग किंवा भाषेची जोड असेल, तर विरोधकही त्याचे स्वागत करतात. मात्र, कुठे महिलांचा अनादर, खालच्या भाषेत विधान, समाजाच्या भावना दुखावणे, याचे कधीच समर्थन होत नाही.

Edited By - Amit Awari

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com