मोठ्या साडूने उलथवली धाकट्या साडूची १५ वर्षाची सत्ता - Yedgaon Gram Panchayat elections after 24 years | Politics Marathi News - Sarkarnama

मोठ्या साडूने उलथवली धाकट्या साडूची १५ वर्षाची सत्ता

रवींद्र पाटे
मंगळवार, 19 जानेवारी 2021

गावाने मोठ्या साडूच्या बाजूने कौल देत मागील पंधरा वर्षे धाकट्या साडूच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात दिली. ग्रामपंचायतीच्या तेरा जागांपैकी बारा जागा मोठ्या साडूने जिंकल्या. 

नारायणगाव (जि. पुणे ) : जुन्नर तालुक्यातील येडगाव ग्रामपंचायत निवडणूक तालुक्यात विशेष लक्षवेधी व चर्चेची ठरली. त्याला कारणही तसेच आहे. चक्क दोन साडूंनी निवडणुकीसाठी स्वतंत्र पॅनेल तयार करून एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले होते. 

गावाने मोठ्या साडूच्या बाजूने कौल देत मागील पंधरा वर्षे धाकट्या साडूच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात दिली. ग्रामपंचायतीच्या तेरा जागांपैकी बारा जागा मोठ्या साडूने जिंकल्या. 

येडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, जनता पक्षाचे जेष्ठ नेते बाबाजी नेहेरकर व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निष्ठावान कार्यकर्ते, गुलाबराव नेहेरकर हे एकमेकांचे सख्ये साडू आहेत. मात्र दोघांचे पक्ष व विचारसरणी वेगळी असल्याने या गावातील कोणत्याही निवडणुकीत ते नेहमीच एकमेकांच्या विरोधात दंड थोपटतात. 

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार वल्लभ बेनके यांच्याकडे पाठपुरावा करून धाकटे साडू गुलाबराव यांनी धरणग्रस्त असलेल्या येडगाव ग्रामस्थांच्या ६५० एकर शेत जमिनीचा सीलिंगचा प्रश्न सोडवला. सरपंच असताना गुलाबराव यांनी ग्रामसंसद इमारत बांधकाम, रस्ते, पाणी, वीज आदी विकास कामे केली.

तरुण द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. यामुळे तरुण शेतकरी वर्ग गुलाबराव यांच्याकडे आकर्षित झाला. सन २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकित सुद्धा गुलाबराव यांनी एकहाती विजय मिळवला होता. 

येडगाव ग्रामपंचायतीची सदस्य संख्या तेरा असून निवडणुकीसाठी गुलाबराव नेहेरकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत येडेश्वर ग्रामविकास पॅनेल तर बाबाजी नेहेरकर, सह्याद्री भिसे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय येडगाव महाविकास आघाडी तयार करण्यात आली होती.

प्रचारात दोन्ही साडूंनी एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. यामुळे दोन साडूमधील राजकिय संघर्षाची चर्चा तालुक्यात रंगली. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले होते. 

येडगाव महाविकास आघाडीचे बारा तर येडेश्वर पॅनेलचा एक उमेदवार विजयी झाला. येडेश्वर पॅनेलचा पराभव करून  पंधरा वर्षानंतर ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेण्यात बाबाजी नेहेरकर यांनी यश मिळवले. येडेश्वर ग्रामविकास पॅनेलच्या उज्वला भिसे या एकमेव उमेदवार विजयी झाल्या.

येडगाव महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार 

हर्षल गावडे, मोनिका काशीद, सुजाता जाधव, सागर नेहेरकर, नीलम खरात, साधना बांगर, विलास नांगरे, अंकुश भोर, सीमा भोर, बशीरभाई मोमीन, अजय नेहेरकर, योजना काशीद. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख