आता कोण कोण राह्यलंय आमच्या वेळचं : शरद पवारांचे भावनिक उद्‌गार  - Who's left now is our time : Sharad Pawar's emotional exclamation | Politics Marathi News - Sarkarnama

आता कोण कोण राह्यलंय आमच्या वेळचं : शरद पवारांचे भावनिक उद्‌गार 

संतोष शेंडकर 
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

मित्राच्या आठवणींनी काही काळ पवार स्तब्धही झाले.

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे घनिष्ठ मित्र आणि पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव भोसले यांचे शुक्रवारी (ता. 30 ऑक्‍टोबर) निधन झाले. वाणेवाडी (ता. बारामती) येथे भेट देऊन पवारांनी भोसले कुटुंबीयांचे सांत्वन केले. मित्राच्या आठवणींनी काही काळ पवार स्तब्धही झाले. याच वेळी त्यांनी "आता कोण कोण राह्यलंय आमच्या वेळचं? रघुदादा, बी. जी., के. वाय. एवढेच राहिले सोबत' असे भावनिक उद्‌गारही काढले. 

शिवाजीराव भोसले यांची पवार यांच्याशी 1962 पासून घनिष्ठ मैत्री होती. भोसले यांच्या पत्नी विमल यांचे 18 ऑक्‍टोबरला निधन झाले होते. ते वृत्त समजाताच पवारांनी भोसले यांना भेटायला जाण्याचे नियोजन केले. पवार निघालेही होते; पण भोसले यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्याला उपचारांसाठी हलविण्यात आले. दुर्दैवाने भोसले यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यानंतर आज सकाळी सव्वादहा वाजता शरद पवार आणि प्रतिभा पवार या दांपत्याने भोसले कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी पवार यांनीही मित्राची शेवटची भेट होऊ न शकल्याची खंत व्यक्त केली. 

शरद पवार यांच्यासोबत बारामतीच्या पश्‍चिम भागात अनेक कार्यकर्ते होते. त्यामधील वसंतकाका जगताप, नथुराम गीते, रामचंद्र भगत, आनंदराव भोसले असे जुन्या पिढीतील अनेक मोहरे निवर्तले.

आता शिवाजीराव भोसले यांच्यासारख्या अत्यंत जवळचा मित्र गेल्याने पवार यांना हळहळ वाटली. यातूनच त्यांनी "आता आमच्या वेळचं कोण कोण राह्यलंय?' असा प्रश्न केला. त्यावेळी पश्‍चिम भागातील पवारांच्या पिढीतील मित्र बी. जी. काकडे, रघुनाथ भोसले, के. वाय. जगताप हे हजर होते. पवार यांनी त्यांचा उल्लेख करत आता एवढेच राहिलो, असे सांगितले. त्यानंतर "खूप व्यस्त कार्यक्रम आहे. सावंतवाडीला जायचंय असं,' म्हणून शरद पवार यांनी या मित्रांचा निरोप घेतला. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख