वाढलेल्या मतांमुळे कोण विजयी होणार ! लाड की देशमुख ? 

वाढलेल्या मतांचा फटका कुणाला बसणार आणि फायदा कुणाला होणार याची चर्चा दुपारपासूनच सुरू झाली
वाढलेल्या मतांमुळे कोण विजयी होणार ! लाड की देशमुख ? 

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघात यावेळी ऐतिहासिक मतदान झाले. पुण्यास संपूर्ण मतदारसंघात दुपारी चार वाजेपर्यंत 49 टक्के मतदान झाले. मतदानाची अंतिम टक्केवारी आणखी वाढणार असून वाढलेली मतांची टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडणार व कुणाला विजयी करणार हे तीन डिसेंबरच्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. 

ही निवडणूक भारतीय जनता पार्टी विरूध्द राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी अशी होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून इच्छुकांची संख्या मोठी होती. साहजिकच या पक्षातून बंडखोरांची संख्या अधिक होती. डॉ. श्रीमंत कोकाटे, निता ढमाले ही यातील प्रमुख नावे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रूपाली पाटील तसेच शरद पाटील व अन्य अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीत जाण आणली. 

प्रत्येकाने व्यापक प्रचार केल्याने तसेच प्रमुख उमेदवारांच्या मागे उभ्या असलेल्या पक्षीय नेटवर्कने भूमिका बजावल्याने मतदानाचा टक्का प्रचंड वाढला आहे. वाढलेल्या मतांचा फटका कुणाला बसणार आणि फायदा कुणाला होणार याची चर्चा दुपारपासूनच सुरू झाली. त्यानंतर मतदानाची टक्केवारी आणखी वाढत गेली. महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी तिन्ही पक्षांची विशेषत: राष्ट्रवादी तसेच कॉंग्रेसची यंत्रणा प्रत्यक्ष मतदानाच्या कामात यावेळी मोठ्याप्रमाणात सक्रिय असल्याचे जाणवले. त्याचाही परिणाम मतांची टक्केवारी वाढण्यात झाला आहे. 

भारतीय जनता पार्टीची निवडणुकीची यंत्रणा नेहमीच योग्य दिशेने काम करीत असते.नियोजनात त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. यावेळीदेखील मतदार नोंदणीत त्यांनी आघाडी घेतली होती.आजच्या मतदान प्रक्रियेतही त्यांचे नियोजन चांगले होते. मात्र, महाविकास आघाडीकडून अनेपक्षितपणे चांगले नियोजन करण्यात आले. मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यात यावेळी महाविकास आघाडीला यश मिळाल्याचे दिवसभरातील निरीक्षणावरून लक्षात येते. 

राष्ट्रवादीच्या बंडखोर इच्छुकांनी नेटाने केलेला प्रचार तसेच मनसेच्या रूपाली पाटील यांच प्रभाव हेदेखील अधिक मतदानाचे महत्वाचे कारण आहे. डॉ. कोकाटे व रूपाली पाटील यांनी सर्वांचा अंदाज चुकवत मोठ्या मतांची आघाडी मारली तर विशेष वाटू नये, असे आजच्या मतदानावरून स्पष्ट होत आहे. भाजपा व महाविकास आघाडीचे उमेदवार अनुक्रमे संग्राम देशमुख व अरूण लाड यांच्यामुळे जितके मतदान वाढले तितकेच डॉ. कोकाटे, रूपाली पाटील, निता ढमाले, शरद पाटील व निशा बिडवे यांच्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली आहे. 

निवडणूक जाहीर झाल्याच्या दिवसापासून ही निवडणूक अरूण लाड विरूद्ध संग्राम देशमुख अशी न राहता जयंत पाटील विरूद्ध चंद्रकांत पाटील या दोन प्रदेशाध्यक्षांमधील लढत ठरली होती. या दोन प्रदेशाध्यक्षांमधील कोण जिंकणार हे तीन डिसेंबरच्या मतमोजणीतून स्पष्ट होईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com