गौतम पाषाणकर यांच्या गायब होण्यामागे कोणता राजकारणी? - Which politician was behind the disappearance of Pashankar is the question | Politics Marathi News - Sarkarnama

गौतम पाषाणकर यांच्या गायब होण्यामागे कोणता राजकारणी?

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

पोलिसांनी `या` प्रमुख कारणांमुळे अधिकृत माहिती दिलेली नाही...

पुणे : पुण्यातील उद्योजक, बांधकाम व्यावसायिक गौतम पाषाणकर यांच्या गायब होण्याचे गूढ पुणे पोलिसांना आठ दिवसांत अद्याप उलगडलेले नाही. त्यात या प्रकरणातील वेगवेगळे पैसू समोर येत असल्याने यातील काही बाबी पोलिसांनाही चक्रावणाऱ्या ठरल्या आहेत. पाषणाकरांची आत्महत्या करणारी चिठ्ठी मिळाल्याने पोलिसांनी त्या अॅंगलने सुरवातीला तपास केला. नंतर आर्थिक बाबींमुळे अपहरणाचा दावा करण्यात आला आणि आता थेट राजकीय नेत्यांवर सशंय घेण्यात आला.

पाषाणकर यांचे चिरंजीव कपिल यांनी काही खळबळजनक बाबींचा दावा केला आहे. पाषाणकर यांच्या अपहरणामागे राजकीय नेता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ते यावर थांबले नाहीत तर हा नेता गेली तीन दिवस मंत्रालयात ठाण मांडून असल्याचे म्हटले आहे. मात्र त्या नेत्याचे नाव माध्यमांना सांगण्यास त्यांनी नकार दिला. 

त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे पुण्यातील कोणता राजकारणी या प्रकारामागे आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. पाषणाकर हे अॅटो, बांधकाम, ब्रिवरीजेस अशा अनेक व्यवसायांत आहेत. त्यामुळे राजकारणातील अनेक वरिष्ठ नेत्यांचा त्यांचा जवळचा संबंध आहे. त्यात सोलापूर, नाशिक, रायगड या जिल्ह्यांतील बड्या नेत्यांतही त्यांची उठबस होती. पुण्यातील अनेक स्थानिक राजकारण्यांशी त्यांचा जवळचा संबंध होता. त्यातील काही राज्यातील सत्तेतही आहेत. व्यवसायासाठी पाषाणकर यांनी व्याजाने बाजारातून पैसे उचलले होते. कोरोनानंतर सारेच व्यवसाय अडचणीत आल्याने त्या चक्रात पाषाणकरही अडकले. त्यामुळे असे व्याजाने कर्ज देणारे हे पाषाणकर यांना त्रास देत होते, असेही त्यांच्या कुटुंबियांनी सूचित केले. असे कर्ज देणाऱ्यात कोण्या राजकीय नेत्याचा हात होता का, असा प्रश्न आता पोलिसांना पडू लागले आहेत. 

या प्रकरणात राजकीय नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर यामागे कोण असेल यावर अनेकांनी अंदाज बांधला. पोलिस या विषयावर अद्याप अधिकृतरित्या माहिती सांगण्यास तयार नाहीत. पण राजकारणात राहून जमीन व्यवहारांत गैरमार्गाने गुंतवणूक करणाऱ्या भाई लोकांची नावे घेतली जाऊ लागली आहेत. पुणे महापालिकेतील कारभारावर प्रभाव असणाऱ्या अशा भाईंकडे संशयाची सुरी फिरत आहेत. ही व्यक्ती मंत्रालयात ठाण मांडून बसली असल्याच्या आरोपाने तीन सत्ताधारी पक्षांतीलच कोणी नाही ना, असाही प्रश्न विचारला जात आहे. जोपर्यंत पाषाणकर सापडत नाहीत किंवा पोलिस त्याविषयी बोलत नाहीत तोपर्यंत हे गूढ उलगडण्याची शक्यता कमी आहे.

या प्रकरणातील इतर काही शंकांचाही पोलिस शोध घेत आहेत. त्यात पाषाणकर गायब होण्याची कारणे केवळ बाहेरूनच आहेत की त्यात काही अंतःस्थ बाबी आहेत, याचाही उलगडा पोलिसांना करावा लागणार आहे. पोलिसांनी मिळणारी सारीच माहिती पडताळून पाहावी लागत आहे. त्यामुळेच या केसबाबत ते अद्याप बोलण्यास तयार नाहीत.     

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख