When the BJP was in power, Sharad Butte wrapped up the dam victims for just Rs 15 lakh
When the BJP was in power, Sharad Butte wrapped up the dam victims for just Rs 15 lakh

भाजपची सत्ता असताना शरद बुट्टेंनी धरणग्रस्तांना अवघ्या 15 लाखांत गुंडाळले

काही नेते व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी जमिनी मिळविण्यासाठी फायली तयार केल्या आहेत. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत.

चाकण (जि. पुणे) : ज्या शरद बुट्टे पाटील यांच्या जिल्हा परिषद मतदारसंघात धरणग्रस्त आहेत. त्या धरणग्रस्तांचे प्रश्न गेली पाच वर्षे भाजपची सत्ता असताना त्यांनी का सोडविले नाहीत. त्यांना कोणी अडविले होते. त्यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना का सांगितले नाही. सत्ता पालटली की आवाज उठवायचा, असे त्यांचे काम आहे, असा आरोप आमदार दिलीप मोहिते यांनी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्यावर केला. 

दरम्यान, काही नेते व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी जमिनी मिळविण्यासाठी फायली तयार केल्या आहेत. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. काही नेते पडद्यामागून आंदोलन पेटवत आहेत. स्वतः मोक्‍याच्या जमिनी लाटत आहेत. त्या करोडो रुपयाला विकत आहेत, हे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. सामान्य धरणग्रस्तांना काहीच मिळाले नाही. हे नेते, पुढारी, कार्यकर्ते यांनीच जमिनी लाटल्या आहेत. त्याची चौकशी व्हावी, त्यातून सत्य बाहेर येईल, या मागणीचा मोहिते यांनी पुनरुच्चार केला. 

आमदार मोहिते यांनी सांगितले की, धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न केले. त्यातून बहुतांश धरणग्रस्तांना मोबदला मिळाला. गेली पाच वर्षे भाजपचे सरकार होते, त्यावेळी बुट्टे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न का सोडविले नाहीत. पाच वर्षांच्या काळात काही नेते, पुढारी, एजंट यांनी चाकण परिसरात मोक्‍याच्या जमिनी मिळविल्या. त्या करोडो रुपयांना विकल्या. एका कुटुंबात जमिनी मिळविण्यासाठी तीन ते चार जणांच्या फायली तयार केल्या. त्यातून सामान्य धरणग्रस्तांवर या नेत्यांनी, पुढाऱ्यांनी अन्याय केला आहे. त्याची चौकशी व्हावी, ही माझी मागणी आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी पवार यांच्याकडे शेतकऱ्यांच्या बैठका लावल्या. धरण खेड तालुक्‍यात व पुनर्वसनासाठी जमिनीही खेड तालुक्‍यात पाहिजे. पण, ज्या गावात धरणाचे पाणी जात नाही, ते शेतकरी जमिनी कशा देणार, त्यांचेही आंदोलन सुरू आहे. मी दोन्ही आंदोलनाचा समन्वय साधत आहे. जमिनी धरणग्रस्तांना शेतीसाठी दिल्या जातात. पण, हे काहींजण शेती न करता जमिनी विकतात. काही अधिकारी या नेत्यांना, पुढाऱ्यांना व एजंटांना मदत करतात, असा खळबजनक आरोपही मोहिते यांनी केला. 

चासकमान धरणग्रस्तांना शिरूर तालुक्‍यात जमिनी दिल्या. जमिनी मिळवण्यासाठी एका एजंटाने दोनशे फायली केल्या आहेत, हे धक्कादायक आहे. सामान्य माणूस हेलपाटे मारतो, त्याला जमीन मिळत नाही आणि एजंटांना जमीन तत्काळ मिळते. भाजपचे पालकमंत्री असताना बुट्टे यांनी पंधरा लाख रुपये एवढा कमी मोबदला देऊन शेतकऱ्यांना गुंडाळले. त्या वेळी बुट्टे यांनी शेतकऱ्यांची भूमिका का मांडली नाही, असा सवाल मोहिते यांनी केला. 

जे माझ्यावर खोटे आरोप करतात, त्यांनी आपण धरणग्रस्तांसाठी काय केले हे पाहावे. मी एजंटगिरी केली नाही. अजून पिंपरी, चिंचवडला पाणी जाणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले नाहीतर पाणी नेऊ दिले जाणार नाही. नेते, एजंट आंदोलन करतात, ते मोक्‍याच्या जमिनी मिळवितात, त्या करोडो रुपयाला विकतात, हा धंदा त्यांचा आहे, तो बंद करावा. सामान्य धरणग्रस्तांना मात्र न्याय मिळाला नाही, त्यासाठी मी प्रयत्न करतोय. त्यासाठी पुरावे देऊन आवाज उठविणार आहे, असेही मोहिते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com