काय सांगता? संजय राठोडांच्या राजीनाम्यानंतर पुणे पोलिसांनी केले हे `महत्वाचे` काम! - what pune police does after resignation of Sanjay Rathod | Politics Marathi News - Sarkarnama

काय सांगता? संजय राठोडांच्या राजीनाम्यानंतर पुणे पोलिसांनी केले हे `महत्वाचे` काम!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 2 मार्च 2021

पोलिसांना अद्याप तपासाचा आदेश नाही? 

पुणे : टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी राजकीय वर्तुळाचे लक्ष पुणे पोलिसांकडे लागलेले आहे. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर पुणे पोलिसांचा तपास वेगाने सुरू होईल आणि लवकरच या प्रकरणातील गूढ पडदा दूर होईल, अशी अपेक्षा होती.

मृत्यूच्या दिवशी पूजासोबत असलेले अरुण राठोड, चव्हाण या दोन व्यक्तींचा पुन्हा जबाब घेणे, आॅडिओ क्लिपमधील आवाजाचा शोध घेणे, पूजा चव्हाण हिच्या मोबाईल आणि लॅपटाॅपमधील बाबींचा तपास करणे अशी कामे राठोड यांच्य राजीनाम्यानंतर वेगाने होतील, असा अंदाज असताना पुणे पोलिसांनी त्यातील एक काम केले असल्याचे समजते आहे. ते म्हणजे पूजाचा अंतिम शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाला असून त्यात डोक्याला आणि मणक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्यावर शिक्कामोर्तब या अहवालात करण्यात आले आहे. यातील दुसरे काम म्हणजे या प्रकरणावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी उत्तर नेता ते पत्रकार परिषदेतून उठून गेले. ही दोन कामे प्रत्यक्षरित्या झाल्याचे गेल्या दोन दिवसांत दिसून आले आहे.

ही पण बातमी वाचा ः राठोड यांच्या राजीनाम्यानंतर यवतमाळातील राजकीय चित्र बदलणार?

पूजा हिच्या मृत्यूला जवळपास 25 दिवस पूर्ण होत आहेत. अद्याप त्यावर पोलिसांनी पूर्ण जोम लावून तपास केला नाही. त्यांच्यावर दबाव असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहे. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल, असे अपेक्षित असताना पुणे पोलिसांचे मौन कोड्यात टाकणार आहे. विधीमंडळाचे अधिवेशन सध्या सुरू आहे. त्या कालावधीत वादाचा नवीन मुद्दा नको म्हणूनही यावर पोलिस अधिकृतरित्या बोलण्यास तयार नसावेत, असा अंदाज बांधला जात आहे. पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करावा, अशी अपेक्षा असताना त्यादृष्टीनेही पावले पडलेली नाहीत. 

भाजप नेत्यांविरोधात तक्रार

दुसरीकडे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी होत असल्याची वानवडी पोलिसांकडे पोस्टाद्वारे तक्रार करण्यात आली आहे.  अँड. रमेश खेमू राठोड यांनी हे अर्ज केल्याचे समजते आहे.  यामध्ये भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ, नगरसेवक धनराज घोगरे, आमदार अतुल भातखळकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, युवा मोर्चा पुणे शहर आणि इतर अनेक गैर अर्जदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पीडित कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्याचाही अर्जात उल्लेख. फ्लॅट बंद असतांना मोबाइल आणि लॅपटॉप मधून ऑडिओ क्लिप आणि इतर माहिती बाहेर गेली कशी असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. याची पोलिस किती दखल घेतात हे पुढील काळात दिसून येईल. 

संजय राठोड अधिवेशनाकडे फिरकले नाहीत...

माजी मंत्री राठोड हे अधिवेशनाकडे फिरकले नसल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी अधिवेशन चालू देणार नाही, अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली होती. या प्रकरणात अद्याप क्लिन चीट मिळाली नसल्याने ते संपूर्ण अधिवेशन अनुपस्थित राहणार की आपली बाजू मांडण्यासाठी ते येणार, याची उत्सुकता आहे. 
  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख