पुणे : खासगी चारचाकी वाहनांतून प्रवास करताना चेहऱ्याला मास्क लावण्याची अट पुणे महापालिकेने शिथील केली आहे. त्यामुळे कारमधून फिरताना नागरिकांना आता मास्क वापरण्याची गरज नाही. मात्र, कारमध्ये एकाच कुटूंबातील व्यक्ती असतील तरच ही सुट देण्यात आली आहे. वाहनामध्ये कुटुंबाबाहेरील व्यक्ती असल्यास मास्क बंधनकारक असेल.
कोरोना विषाणुचे संक्रमण रोखण्यासाठी कोणत्याही वाहनांतून प्रवास करताना सर्व प्रवाशांना मास्क बंधनकारक आहे. मास्क नसल्यास पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. यावरून पुण्यात अनेकदा वादही झाले आहेत.
पोलिसांकडून विनाकारण त्रास दिला जात असल्याच्या तक्रारीही अनेकांनी केल्या होत्या. तसेच राज्यात मुंबईसह अन्य शहरांमध्येही अशाच तक्रारी आहेत. यापार्श्वभुमीवर मुंबई महापालिकेने नुकतीच खासगी वाहनांतून प्रवास करताना मास्कची अट शिथील करण्याचा निर्णय घेतला होता.
आता पुणे महापालिकेनेही त्याच पावलावर पाऊल टाकत पुणेकरांना दिलासा दिला आहे. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचा आदेश काढला. शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, महापालिका क्षेत्रामध्ये खाजगी चारचाकी वाहनांतून कुटूंबातील व्यक्ती प्रवास करताना मास्क वापराबाबत सुट देण्यात येत आहे. प्रवासात वाहनामध्ये वाहन चालकासह सर्व व्यक्ती एकाच कुटूंबातील असणे आवश्यकक राहील.
कुटूंबातील व्यक्तीसोबत अन्य वाहन चालक अथवा अन्य व्यक्ती एकत्रित प्रवास करत असतील तर मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मास्क वापराबाबतचे इतर नियम यापुढेही कायम राहणार असल्याचेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान, अॉक्टोबर महिन्यापासून पुण्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नवीन कोरोना विषाणुचे रुग्णही आढळून येत नसल्याने दिलासा मिळाला आहे. परिणामी, प्रशासनाकडून लॉकडाऊनच्या काही अटी टप्प्याटप्याने शिथील केल्या जात आहेत. त्यानुसार मास्क वापराबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
Edited By Rajanand More

