उद्‌घाटनाची प्रचारसभा पाहता आम्ही सर्व 17 जागा जिंकणार : माधव काळभोर 

या पूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व पॅनेलच्या प्रचाराचा प्रारंभ मंदिरात करण्याची परंपरा आहे.
We will win all 17 seats in Loni Kalbhor Gram Panchayat elections: Madhav Kalbhor
We will win all 17 seats in Loni Kalbhor Gram Panchayat elections: Madhav Kalbhor

उरुळी कांचन (जि. पुणे) : हवेली तालुक्‍यातील लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलने प्रचारात पहिल्या दिवसापासून आघाडी घेतली आहे. प्रचारादरम्यान मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता या निवडणुकीत परिवर्तन पॅनेल सतराच्या सतरा जागी विजयी होणार आहे, असा विश्‍वास परिवर्तन पॅनेलचे प्रमुख तथा यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर यांनी व्यक्त केला. 

हवेलीसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीत माधव काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शिवदास काळभोर, साधना सहकारी बॅंकेचे संचालक सुभाष काळभोर यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शेलार, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर यांच्या सहकार्याने परिवर्तन पॅनेल उभे करण्यात आले आहे. 

या पॅनेलची प्रचार सभा नुकतीच लोणी काळभोर गावात पार पडली. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माधव काळभोर यांनी वरील विश्‍वास व्यक्त केला. 

काळभोर म्हणाले या पॅनेलच्या प्रचाराचा प्रारंभ ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाला नारळ वाढवून नुकताच करण्यात आला. या वेळी मंदिरासमोर एक जंगी सभा पार पडली. या पूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व पॅनेलच्या प्रचाराचा प्रारंभ मंदिरात करण्याची परंपरा आहे. परंतु या वेळी मतदारांचा प्रतिसाद जोरदार आहे. ग्रामपंचायतीच्या सत्तेत परिवर्तन करण्याचे मतदारांनी मनोमन ठरवले आहे. त्यामुळे नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला गर्दी खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने हा कार्यक्रम मंदिरासमोरच्या मोकळ्या पटांगणात घ्यावा लागला. 

"कुठल्याही गावाच्या विकासात ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची असते. ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेल्या सदस्यांमध्ये जर विकासाचा दृष्टीकोन असेल तर गावाचा विकास वेगाने होतो. परिवर्तन पॅनेलमध्ये तरुण, अनुभवी, अभ्यासू व विकासाचा दृष्टीकोन असलेल्या उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. परिवर्तन पॅनेलमधील उमेदवारांना गावातील समस्यांची जाणीव आहे. त्यामुळे हे उमेदवार गावाच्या विकासासाठी झोकून देऊन काम करणार आहेत. आगामी पाच वर्षात गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचा परिवर्तन पॅनेलचा विचार आहे,'' असे माधव काळभोर म्हणाले. 

विलास काळभोर, सुनंदा शेलार, युगंधर काळभोर, भोलेनाथ शेलार, योगेश काळभोर या सर्वांनी पदावर असताना वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या माध्यमातून मोठा निधी आणून गावात विकास कामे केलेली आहेत. हे मतदारांनी पाहिले आहे. आगामी काळात मतदारांना विकास हवा आहे. त्यामुळे परिवर्तन पॅनेलच्या मागे मतदारांनी आपली मोठी ताकद उभी केली आहे. त्यामुळे परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून येतील, असा दावाही त्यांनी या वेळी बोलताना केला. 

काळभोर म्हणाले, "लोणी काळभोर हे गाव पुणे शहरालगत असल्याने गावातील नागरीकरणाचा वेग प्रचंड आहे. गावाची लोकसंख्याही वेगाने वाढत आहे. त्या प्रमाणात सोयीसुविधा निर्माण करण्याची गरज आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शेलार, पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून जिल्ह्यात एक आदर्श गाव म्हणून पुढे आणण्याचे सर्व नियोजन परिवर्तन पॅनेलने केले आहे.

ही बाब मतदारांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी होतील व आम्ही 17-0 असा दणदणीत विजय मिळवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com