एका बैठकीला एकत्र आलो; म्हणजे मागचं सगळं मिटलं असं नाही : पंकजांचा धनंजय मुंडेंना इशारा  - We came together for one meeting; I mean, not everything is gone: Pankaja's warning to Dhananjay Munde | Politics Marathi News - Sarkarnama

एका बैठकीला एकत्र आलो; म्हणजे मागचं सगळं मिटलं असं नाही : पंकजांचा धनंजय मुंडेंना इशारा 

सागर आव्हाड 
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

धनंजय मुंडे आणि माझ्याबाबत काही चांगलं होणार नाही. कारण चांगलं झालं तर आमच्या दोघांच्या पक्षात प्रॉब्लेम होईल.

पुणे : जनतेच्या प्रश्नावर एकत्र असण्यात काही वावगं नाही, याचा अर्थ मागचं सगळं मिटलं असा नाही, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबरोबर भविष्यातही आपला राजकीय संघर्ष सुरू राहील, असे सूचित केले. 

ऊस तोडणी कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आज (ता. 27 ऑक्‍टोबर) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊस तोडणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक बोलवण्यात आली होती.

या बैठकीसाठी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक धनंजय मुंडे, पंकजा मुंडे एकत्र आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर विचारलेल्या प्रश्‍नावर पंकजा यांनी वरील उत्तर दिले. याच बैठकीला सुरुवातीला धस यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र त्यांनी गेटवर आंदोलन सुरू केल्यामुळे त्यांना प्रवेश देण्यात आला होता. त्याबाबतही त्या बोलल्या. 

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि माझ्याबाबत काही चांगलं होणार नाही. कारण चांगलं झालं तर आमच्या दोघांच्या पक्षात प्रॉब्लेम होईल. मी त्यांच्याबाबत कायम दिलदारी दाखवली आहे. त्यांना पुरस्कार मिळाला तर मी अभिनंदन केले. आजारी असताना विचारपूस केली, अशा गोष्टींमध्ये मी कधीही विसंवाद आणत नाही, असेही पंकजा मुंडे या वेळी म्हणाल्या. 

सुरेश धस यांना बाहेर का थांबायला सांगितले, याविषयी मला माहित नाही. मला बैठकीचे निमंत्रण होतं, मी बैठकीला आले. ज्यांना निमंत्रण होते, ते सर्वजण बैठकीला उपस्थित होते. माझा दबाव असण्याचे कोणतेही कारण नाही, असे स्पष्टीकरण पंकजा यांनी या वेळी दिले. 

"राज्यात सगळे म्हणतात की मी नाराज आहे. पण, मी अजूनही तसं म्हटलेलं नाही. नाराजी असण्याचा काही विषयच नाही. मी पक्षात समाधानी आहे, असेही पंकजा या वेळी म्हणाल्या. 

एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, त्याबाबत पंकजा यांनी सांगितले की, खडसे साहेबांच्या प्रवेशविषयी मी भावना व्यक्त केलेल्या आहे. अशा कोणत्याही घटना महाराष्ट्रात घडल्या की माझ्या नावाची चर्चा होते. पण अशा चर्चाकडे मी दुर्लक्ष करते, असे त्यांनी नमूद केले. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख