गुंजवणीचे पाणी शेतकऱ्यांना दिल्याशिवाय मरणार नाही : विजय शिवतारे 

किडनीच्या आजाराने ग्रस्त असतानाही शिवतारे यांनी आपल्या या ड्रीम प्रोजेक्‍टसाठी बनविण्यात येणाऱ्या पाइपनिर्मिती प्रकल्पास शुक्रवारी (ता. 18 सप्टेंबर) भेट देऊन पाहणी केली.
Vijay Shivtare's visit to the Gunjwani project's pipe making project
Vijay Shivtare's visit to the Gunjwani project's pipe making project

सासवड (जि. पुणे) : गुंजवणी बंद पाइपलाइन प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. या कामाला निधीची अडचण होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांना विनंती केली आहे. या योजनेत मी प्राण फुंकले आहेत, त्यामुळे गुंजवणीचे पाणी शेतकऱ्यांना दिल्याशिवाय मी मरणार नाही, असा निर्धार माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बोलून दाखविला. 

पुरंदर, भोर व वेल्हे तालुक्‍यास सिंचनासाठी लाभदायक ठरणाऱ्या गुंजवणी प्रकल्पाच्या पाइप निर्मिती प्रकल्प पांडे (ता. भोर) येथे सुरू आहे. किडनीच्या आजाराने ग्रस्त असतानाही शिवतारे यांनी आपल्या या ड्रीम प्रोजेक्‍टसाठी बनविण्यात येणाऱ्या पाइपनिर्मिती प्रकल्पास शुक्रवारी (ता. 18 सप्टेंबर) भेट देऊन पाहणी केली.

या वेळी त्यांनी कामाचा आढावा घेत वेग वाढविण्याच्या सूचना एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांसह जलसंपदा विभागाला दिल्या. 

या वेळी पुरंदरचे माजी सभापती अतुल म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, हरिभाऊ लोळे, युवा सेनेचे अध्यक्ष मंदार गिरमे, सासवड शहरप्रमुख अभिजित जगताप, समीर जाधव, कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल आदी उपस्थित होते. 

काही लोक काहीच कळत नसताना उगाच भलतेच मुद्दे चघळत बसत आहेत. सध्या पाइपलाइन होणं आणि पुरंदरच्या शिवारात पाणी पोचणं काळाची गरज आहे. आवश्‍यकतेनुसार प्रकल्पाच्या लाभक्षेत्राबाबत पुढे निर्णय घेता येतात.

देशातील नामवंत तज्ज्ञांसह ही योजना आकाराला आली आहे. केंद्र सरकारने त्यावर प्रभावित होऊन संबंध देशात बंद पाइपलाइनचे धोरण स्वीकारले आहे, असे शिवतारे यांनी सांगितले. 

शिवतारे म्हणाले की, गुंजवणी हा माझा ड्रीम प्रोजेक्‍ट आहे. गुंजवणी धरण विक्रमी वेळेत पूर्ण करून देशातील पहिली बंद पाइपलाइन योजना गुंजवणीसाठी मंजूर करून घेतली होती. या पाइपलाइनचे काम एल अँड टी या विख्यात कंपनीकडे आहे. या कंपनीने पांडे येथे 68 एकर क्षेत्रावर पाईपनिर्मिती आणि साठवण सुरू केलेली आहे.

सुमारे 60 किलोमीटरपर्यंत काम पूर्ण होईल, एवढे पाइप सध्या तयार आहेत. उपवितरिकांसाठी लागणारे छोटे पाइप हे थेट कोलकत्याहून येत असून, टाटा समूह स्वतः हे पाइप तयार करीत आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे आणि जलसंपदामंत्री पाटील यांच्याशी या प्रकल्पाबाबत चर्चा केली आहे. या कामाला निधीची अडचण होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. ज्या कामासाठी मी माझं आयुष्य आणि शरीर पणाला लावलं, ते पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार विजय शिवतारे यांनी बोलून दाखविला. 

योजनेची वैशिष्ट्ये 
► सिंचनाखालील क्षेत्र : वेल्हे तालुका- 850 हेक्‍टर, भोर तालुका- 9435 हेक्‍टर, पुरंदर तालुका-11हजार107 हेक्‍टर. 
►365दिवस 24 तास पाणी उपलब्धता, शेतकऱ्यांना सोयीनुसार पिके घेण्याचे स्वातंत्र्य, ठिबक किंवा पाट पद्धतीने पाणी देण्याची मुभा 
►2400 मि.मी. व्यासाचा पाइप, आवश्‍यक तेथे स्लुईस व एअर वॉल्व्ह. 
► जवळपास 60 किलोमीटर काम पूर्ण होईल एवढे पाइप तयार 
►पाईपला गंजरोधक रंगकाम आणि बाहेरच्या बाजूने सिमेंटचा थर 
►गावपातळीवरील उपवितरीकांसाठी थेट कलकत्त्याहून छोट्या पाईपची आवक सुरू 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com