शिक्रापूरचा सरपंच अखेर बांदल गटाचाच; उपसरपंच निवडीत पुन्हा नाट्यमय घडामोडी  - Unopposed election of Ramesh Gadde of Bandal group as Sarpanch of Shikrapur Gram Panchayat | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

शिक्रापूरचा सरपंच अखेर बांदल गटाचाच; उपसरपंच निवडीत पुन्हा नाट्यमय घडामोडी 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

माजी सभापती बांदल यांचे पुतणे निखील बांदल यांना हरवून विजयी झालेले सुभाष खैरे यांची उपसरपंचपदी वर्णी निश्‍चित मानली जात होती. 

पुणे : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कायम ठेवल्याने शिरूर तालुक्‍यातील शिक्रापूर ग्रामपंचायतीचा सरपंच जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या गटाचाच झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी रमेश गडदे यांची बिनविरोध निवड झाली. पण, उपसरपंच निवडणुकीत मात्र पुन्हा नाट्यमय घडामोडी घडल्या. या निवडणुकीत बांदलविरोधी बहुमत असलेल्या गटाचे उपसरपंच 10 विरोधी 7 मतांनी जिंकणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र 9 विरोधी 8 अशी मतविभागणी झाली. त्यामुळे उपसरपंच निवडणुकीत बांदल गटाला एक मत जादा मिळाले. 

शिक्रापूरचे सरपंचपद हे अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव झाले होते. या प्रवर्गाचे रमेश गडदे हे एकमेव उमेदवार बांदल गटाकडून विजयी झाले होते. त्यामुळे सरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदी सुभाष खैरे यांची वर्णी लागली. 

शिक्रापूर ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच बापूसाहेब जकाते, आबासाहेब करंजे, आबाराजे मांढरे, बाबासाहेब सासवडे, सोमनाथ भुजबळ, अरुण करंजे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला 9, तर बांदल यांच्या पॅनेलला 7 जागा मिळाल्या होत्या. एका जागेवर अपक्ष विजयी झाला होता. सरपंचपदाचे आरक्षण असलेले अनुसुचित जाती-जमातीचे एकमेव उमेदवार रमेश गडदे हे बांदल गटाचे असल्याने या आरक्षणाला ग्रामपंचायत सदस्य रमेश थोरात, पुजा भुजबळ आदींनी उच्च न्यायालयात हरकत घेतली होती. पण, न्यायालयाच्या आदेशानुसार याचा निर्णय जिल्हाधिकारी स्तरावर झाला. 

या याचिकेमुळे शिरूर तालुक्‍यातील 71 सरपंच निवडी 15 दिवस लांबल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही थोरात पुन्हा न्यायालयात गेल्याने आजची निवड न्यायालयाच्या पुढील (ता. 16 मार्च रोजी) तारखेच्या सुनावणीनंतर आदेशाच्या निकालाअधिन असणार आहे. 

दरम्यान, उपसरपंचपदासाठी सुभाष बबन खैरे, शालन अनिल राऊत व मोहिनी युवराज मांढरे यांनी अर्ज भरले होते. यातील राऊत यांनी माघार घेतल्याने अंतिम लढत खैरे व मांढरे यांच्यात झाली. यात खैरे यांना 9, तर मांढरे यांना 8 मते मिळाली, त्यामुळे सुभाष खैरे हे शिक्रापूरच्या उपसरपंचपदी विराजमान झाले. माजी सभापती बांदल यांचे पुतणे निखील बांदल यांना हरवून विजयी झालेले सुभाष खैरे यांची उपसरपंचपदी वर्णी निश्‍चित मानली जात होती, त्या प्रमाणेच आज तसे घडले. 

राजकीय कुरघोडीची पुन्हा चुणूक ! 

मागील पंचवार्षिक निवडणुकीतही बांदल गटाला 8, तर विरोधी गटाला 9 अशा जागा मिळालेल्या होत्या. या वेळी मात्र बांदल गटाला 7, तर विरोधी गटाला 9 जागा मिळाल्या आहेत. एक अपक्ष महिला सदस्य निवडून आली आहे. त्यामुळे उपसरपंचपदी बांदल विरोधी गटाला उपसरपंचपद 10 विरोधी 7 च्या फरकाने मिळायला हवे होते. मात्र, प्रत्यक्षात उपसरपंच खैरे यांना 9, तर मोहिनी मांढरे यांना 8 मते मिळाली. त्यामुळे बांदल गटाने पुन्हा एकदा राजकीय कुरघोडीची चुणूक दाखवली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख