Two crore ransom case as Information activists, police and journalists involved in the scam | Sarkarnama

चक्रावून टाकणारे दोन कोटींचे खंडणी प्रकरण : माहिती कार्यकर्ता, बडतर्फ पोलिस आणि पत्रकार सामील 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 7 जुलै 2020

र्यादीला बावधनमधील सदनिका व सहा लाख रूपये द्या, अन्यथा खोटा गुन्हा दाखल करेल, सुपारी देऊन जिवे मारण्याची धमकी दिली. पैसे नसल्यास स्टॅम्प पेपरवर लिहुन देत तडजोड करण्याची मागणी केली. त्यावेळी बऱ्हाटे हा माहिती अधिकार कार्यकर्ता असून त्याचे राजकीय लोकांशी संबंध असल्याचे, शैलेश जगताप हा पोलिस असून तो कोणताही गुन्हा दाखल करु शकतो, अमोल चव्हाण हा वसूली करत असल्याने तो गुंड प्रवृत्तीचा आहे, तर देवेंद्र जैन हा पत्रकार आहेत, असे सांगून तिने फिर्यादीला धमकी दिली.

पुणे : जमीन व दोन कोटी रूपयांच्या खंडणीसाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करुन बांधकाम व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका महिलेसह माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे, बडतर्फ पोलिस हवालदार शैलेश जगताप, पत्रकार देवेंद्र जैन व अमोल चव्हाण अशा पाच जणाविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला. माहिती अधिकार कार्यकर्ता व पत्रकाराविरुद्ध खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली.

याप्रकरणी सुधीर कर्नाटकी (वय 64,पौड रोड, कोथरूड) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन दीप्ती अनिल आहेर (रा.बावधन, कोथरुड), रविंद्र लक्ष्मण बऱ्हाटे (रा. लुल्लानगर, कोंढवा), शैलेश हरिभाऊ जगताप (रा.भवानी पेठ), अमोल सतीश चव्हाण (रा. चव्हाणवाडा, कोथरुड) व देवेंद्र फूलचंद जैन (सिंहगड रोड, कोथरुड) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध जिवे मारण्याची धमकी देत खंडणी मागणे, संगनमत करुन कट रचणे, धमकाविणे अशा प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्नाटकी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची 2007 मध्ये दीप्ती आहेर हिच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री वाढली. 2013 मध्ये आहेर हिने फिर्यादीकडे तिच्या कुटुंबासाठी त्यांच्या ओळखीने भाडयाने मोठे घर मिळवुन देण्याचा आग्रह धरला. त्यावेळी फिर्यादीने त्यांच्या ओळखीने बावधन येथे तीन बेडरुमची मोठी सदनिका तिला मिळवून दिली. त्याचे भाडे फिर्यादी स्वत: भरत होते. त्यानंतर 2017 मध्ये संबंधीत सदनिका दोघानी संयुक्तपणे खरेदी करुन दोघाच्या नावावर केली. सदनिकेचे बैंकेचे हफ्ते फिर्यादी स्वत: भरत होते.

दरम्यान, 2019 पासून आहेर ही फिर्यादीकडे पैशांची अवास्तव मागणी करु लागली. वेळोवेळी फिर्यादीवर खोटे आरोप करुन गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती. नोव्हेंबर 2019 मध्ये फिर्यादी आहेर ही रवींद्र बऱ्हाटे, शैलेश जगताप, अमोल चव्हाण व देवेंद्र जैन यांना घेऊन आली. त्यावेळी तिने फिर्यादीला बावधनमधील सदनिका व सहा लाख रूपये द्या, अन्यथा खोटा गुन्हा दाखल करेल, सुपारी देऊन जिवे मारण्याची धमकी दिली. पैसे नसल्यास स्टॅम्प पेपरवर लिहुन देत तडजोड करण्याची मागणी केली. त्यावेळी बऱ्हाटे हा माहिती अधिकार कार्यकर्ता असून त्याचे राजकीय लोकांशी संबंध असल्याचे, शैलेश जगताप हा पोलिस असून तो कोणताही गुन्हा दाखल करु शकतो, अमोल चव्हाण हा वसूली करत असल्याने तो गुंड प्रवृत्तीचा आहे, तर देवेंद्र जैन हा पत्रकार आहेत, असे सांगून तिने फिर्यादीला धमकी दिली. बऱ्हाटेने सांगितल्याप्रमाणे आहेरने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध त्यांनी सांगितल्याप्रमाणे सदनिका व 6 लाख रूपये देण्याचा करारनामा करुन घेतला.

दरम्यान, 26 डिसेंबर 2019 रोजी फिर्यादी हे खरेदीसाठी बाहर गेले असताना आहेर हिने त्यांना गाठुन दोन कोटी रूपये व रास्ता पेठेतील जमीन देण्याची मागणी केली. तसेच जैन हा पत्रकार असल्याने फिर्यादीविरुद्ध सगळीकडे बातम्या देऊन बदनामी करेल असेही सांगितले. तसेच पुन्हा एकदा रविंद्र बऱ्हाटे व शैलेश जगतापचा पोलिसात खुप वट असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तर 10 जानेवारी 2020 या दिवशी जैन याने फिर्यादीस त्याच्या कार्यालयात बोलावून पुन्हा हे प्रकरण सोपे समजु नकोस, दोन कोटी, जमीन दे. तसेच त्या जमीनीवर पाय ठेवल्यास मुडदा पाडण्याची भाषा वापरली होती. फिर्यादी यांनी त्यांच्या धमक्याना प्रतिसाद न दिल्यामुळे आहेर हिने तिच्या साथीदारांशी संगनमताने कट रचुन फिर्यादीविरुद्ध हिंजवडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात फिर्यादी यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यावर त्यांनी फिर्याद दाखल केली

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख