Travel on Pune-Mumbai Expressway, Old Pune-Mumbai road only if necessary. | Sarkarnama

गरज असेल तरच 'या' मार्गावर प्रवास करा..   

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 जून 2020

मुसळधार पावसामुळे पुणे - मुंबई एक्स्प्रेस वे, जुना पुणे- मुंबई रस्ता, ताम्हिनी घाट, वरंधा घाट आदी ठिकाणी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने विशेष तयारी केली आहे.

पुणे : निसर्ग वादळामुळे निर्माण होणाऱ्या वाऱ्यामुळे सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. हे वादळ वेगाने अलीबागकडे सरकत आहे. या भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. एक्स्प्रेसवेवर 30 पोलिस कर्मचारी आणि अधिकारी विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. जुना- पुणे मुंबई मार्ग येथेही विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे पुणे - मुंबई एक्स्प्रेस वे, जुना पुणे- मुंबई रस्ता, ताम्हिनी घाट, वरंधा घाट आदी ठिकाणी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने विशेष तयारी केली आहे.

अनेक ठिकाणी दरड प्रवण क्षेत्र असल्यामुळे वाहतूक टाळण्याचे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे. रेल्वेनेही वाहतुकीत बदल केला आहे. वादळ आणि पावसामुळे घाटात दरड कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महामार्ग पोलिसांनी अशा प्रत्येक ठिकाणी क्विक रिस्पॉन्स टिम तैनात केली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळानेही (एमएसआरडीसी) पथके तैनात केली आहेत.  

दरड कोसळल्यास ती बाजूला करण्यासाठी पुरेशा संख्येने जेसीबी, ट्रेलर, रुग्णवाहिका आणि संबंधित मनुष्यबळ सज्ज करण्यात आले आहे, अशी माहिती महामार्ग विभागाचे पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली. अमृतानंजन पुलाजवळ दोन किलोमीटरच्या रस्त्यावर विशेष लक्ष पोलिस आणि एमएसआरडीसीच्या पथकांनी ठेवले आहे. वाहतूक सुरू ठेवण्यात आली असली तर, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच प्रवास करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ताम्हिनी आणि वरंधा घाटातही दरडप्रवण क्षेत्रावर दोन्ही यंत्रणांनी लक्ष ठेवले आहे. 

 

दोन रेल्वे गाड्याच्या वेळात बदल

रेल्वेने मुंबईहून सुटणाऱया 14 पैकी 5 गाड्यांच्या वेळात बदल केला आहे. गोरखपूर, विलासपूर, दरभंगा आदी गाड्यांचा त्यात समावेश आहे. तसेच मुंबईत पोचणाऱया 9 पैकी 2 गाड्यांच्या वेळांतही बदल कऱण्यात आला आहे. पुण्यावरून सुटणाऱया किंवा पुण्यात येणाऱया गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आलेला नाही. निसर्ग वादळ ताशी 120 किलोमीटर वेगाने अलिबागकडे सरकत आहे. त्यामुळे संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अलिबाग, ठाणे, पालघर, दिव-दमन आदी ठिकाणांचा त्यात समावेश आहे. या भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे. इलेक्ट्रॅानिक उपकरणे चार्ज करून ठेवावीत, पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवावा. कारण सततच्या पावसामुळे काही भागातील वीज पुरवठा खंडित होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख