बांदलांना नियमबाह्य कर्ज देणे भोवले; भोसले बॅंकेचे तीन मॅनेजर गजाआड - Three branch officers of Shivajirao Bhosale Bank arrested for illegally giving loans to Mangaldas Bandal | Politics Marathi News - Sarkarnama

बांदलांना नियमबाह्य कर्ज देणे भोवले; भोसले बॅंकेचे तीन मॅनेजर गजाआड

भरत पचंगे
शनिवार, 3 जुलै 2021

या तिघांनीही आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

शिक्रापूर (जि. पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज मंजूर केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या तीन शाखांच्या व्यवस्थापकांना शिक्रापूर पोलिसांनी ता. २ जुलै रोजी अटक केली. प्रदीप निम्हण, नितीन बाठे व गोरख दोरगे अशी त्यांची नावे आहेत. या तिघांनीही आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून कर्ज मंजुरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. (Three branch officers of Shivajirao Bhosale Bank arrested for illegally giving loans to Mangaldas Bandal)

वडगाव शेरी शाखेचे गोरख महादेव दोरगे, तर औंध शाखेचे प्रदीप सहदेव निम्हण आणि कोथरुड शाखेचे नितीन मारुतराव बाठे या तीनही व्यवस्थापकांनी बांदला यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज मंजूर केल्याचे दिसून आले आहे. 

हेही वाचा : पालिका आयुक्तांचा आदेश अन् त्यावर पोलीस आयुक्तांची 24 तासांतच धडाकेबाज कारवाई

शिक्रापूर पोलिस ठाण्यात ता. २६ मे रोजी मंगलदास बांदल यांच्याविरोधात दत्तात्रेय रावसाहेब मांढरे यांच्या तक्रारीवरुन पहिला गुन्हा दाखल झाला होता. दुसरा गुन्हा रवींद्र सातपुते यांच्या तक्रारीवरुन ३० मे रोजी, तर १ जून रोजी मंदार पवार यांच्या तक्रारीवरुन तिसरा गुन्हा दाखल झाला होता. हे सर्व गुन्हे शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या फसवणूक प्रकरणातून दाखल झाले आहेत. 

वडगाव शेरी (पुणे) येथील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत (२००७ दरम्यान) तत्कालीन शाखाधिकारी म्हणून गोरख महादेव दोरगे, तर औंध शाखेत प्रदीप सहदेव निम्हण आणि कोथरुड शाखेत नितीन मारुतराव बाठे आदी तिघेजण कार्यरत होते. याच काळात बांदल यांच्या तीनही प्रकरणांत कर्जमंजुरी देताना अनियमितता झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. प्रदीप निम्हण, नितीन बाठे व गोरख दोरगे या तिघांनीही आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याचे स्पष्ट झाल्याने शिक्रापूर पोलिसांनी या तिघांनाही शुक्रवारी (ता. २ जुलै) तपासकामी बोलावून त्यांना अटक केल्याचे शिक्रापूर पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. 

दरम्यान, वरील तीनही गुन्ह्यांमध्ये मंगलदास बांदल यांच्यासह एकुण पाच जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. बॅंकेच्या तीन अधिकाऱ्यांना शिरुर येथील विशेष दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात येणार आहे. या तीनही प्रकरणांचा तपास योग्य पध्दतीने सुरू असून पुढील कारवाई जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक शेडगे यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख