मंत्रिपदासाठी माझा संग्राम थोपटेंशी कोणताही वाद नाही  - There is no dispute with Sangram Thopat from the post of minister: Sanjay Jagtap | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्रिपदासाठी माझा संग्राम थोपटेंशी कोणताही वाद नाही 

श्रीकृष्ण नेवसे 
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

आम्ही दोघे भावासारखे आहोत.

सासवड (जि. पुणे)  : "आमदार संग्राम थोपटे व माझ्यात कोणताही वाद नाही. दोघांनी मिळून संग्राम थोपटेंच्या मंत्रिपदासाठी प्रयत्न केला होता. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अधिक मंत्री असल्याने महाविकास आघाडीतून काही धोरण ठरले असेल, त्यातून थोपटे यांना थांबविले असण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेसअंतर्गत हा वादाचा विषय नाही,' असे स्पष्टीकरण कॉंग्रेसचे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी दिले. 

विधानसभा निवडणूक जिंकल्याच्या घटनेस वर्षपूर्ती झाल्याबद्दल पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांची मुलाखत "सरकारनामा'वर प्रसिद्ध झाली. त्यात जगताप यांनी वरील खुलासा केला. 

भोरचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद देण्याचे ठरले होते, तरीही पुणे जिल्हा कॉंग्रेसने काही तरी घोळ केला, त्यातून थोपटे यांचे मंत्रिपद गेले आणि त्यांच्या ठिकाणी दुसऱ्यालाच संधी मिळाली. यावर पुणे जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काय सांगाल? 

याबाबत आमदार जगताप म्हणाले, "संग्राम थोपटे आणि माझ्यामध्ये कोणताही वाद नाही. आम्ही दोघांनी मिळून संग्राम थोपटे यांच्या मंत्रिपदासाठी प्रयत्न केला होते. मात्र, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री जादा असल्याने महाविकास आघाडीमध्ये काही तरी धोरण ठरले असावे, त्यातून थोपटे यांना थांबविले असण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेसअंतर्गत हा वादाचा विषय नक्कीच नाही. आम्ही दोघे भावासारखे आहोत.'' 

राज्याच्या मंत्रिमंडळातील काही चेहरे बदलण्याची चर्चा आहे. मग, वेळ आली तर आमदार थोपटे यांच्या नावाची शिफारस आपण करणार का? यावर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगताप म्हणाले, "राज्य मंत्रिमंडळातील काही चेहऱ्यांच्या बदलाची चर्चा माझ्या कानावर तर नाही. पण, तुम्ही म्हणता तशी संधी आली, तर निश्‍चितच संग्राम थोपटे यांच्या नावाची शिफारस करण्यात येईल.'' 

जिल्ह्यातील कॉंग्रेसचे तत्कालीन नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कॉंग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात जाऊ नये, अशी आमची इच्छा होती. मात्र, त्यांनी पक्ष सोडला, हे दुर्दैवी होते, असेही आमदार संजय जगताप यांनी या वेळी सांगितले.  

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख