ठाकरे सरकारने 'त्या' हॉटेलचे बिलच भरले नाही  : जगदीश मुळीक

ससून रुग्णालयातील कोरोना कक्षात डॉक्‍टर, नर्स आणि कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून काम करत आहेत.
Thackeray government has not paid the bill for 'that' hotel: Jagdish Mulik
Thackeray government has not paid the bill for 'that' hotel: Jagdish Mulik

पुणे : कोरोना विरोधातील लढ्यात अहोरात्र झटून महत्त्वाची भूमिका बजावणारे ससून रुग्णालयातील डॉक्‍टर आणि नर्सेस यांना निवास आणि भोजनाची मोफत सुविधा निधीअभावी बंद करण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ पुणे शहर भारतीय जनता पक्षाने रुग्णालयासमोर आज (ता. 3 ऑक्‍टोबर) आंदोलन करण्यात आले. जनतेसाठी स्वतःचा जीव धोक्‍यात घालणाऱ्या कोरोना योद्धांच्या बाबत एवढी काटकसर करणे बरे नव्हे, असे म्हणत ही सवलत पूर्ववत सुरू ठेवावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. 

ससून रुग्णालयातील अधिष्ठाता कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात भोजनाची पाकिटे वाटप करण्यात आली. हे आंदोलन शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांना या वेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

या वेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सरकार अकार्यक्षम, असंवेदनशील असून सरकारकडून पुणे शहराला सापत्न वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. या वेळी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. 

ससून रुग्णालयातील कोरोना कक्षात डॉक्‍टर, नर्स आणि कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून काम करत आहेत. गंभीर कोरोना रुग्णांवर हे सर्वजण उपचार करत असतात. त्यामुळे त्यांना संसर्गाची भीती जास्त असते. त्यांच्यामुळे कुटुंबावरही भीतीचे सावट असते. म्हणून या कर्मचाऱ्यांच्या निवासाची आणि भोजनाची मोफत व्यवस्था होणे आवश्‍यक आहे. परंतु निधी नसल्याचे सांगून ही व्यवस्था करता येत नसल्याची ससून रुग्णालय व राज्य सरकारची भूमिका चुकीची आणि निषेधार्थ आहे. ही सुविधा पूर्ववत करा; अन्यथा भाजपला आंदोलन करावे लागेल, असा इशारा माजी आमदार मुळीक यांनी दिला. 

ससून रुग्णालय परिसरातील विविध हॉटेलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्‍टर आणि नर्सेस यांची ड्यूटीच्या कालावधीत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु सरकारने या हॉटेलचे बिल भरले नाही. त्यामुळे हॉटेलचालकांनी हॉटेल देण्यास नकार दिला आहे, असा आरोप शहराध्यक्ष मुळीक यांनी केला. 

या आंदोलनात गणेश घोष, दत्तात्रेय खाडे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर, महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर, युवती अध्यक्षा निवेदिता एकबोटे, झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष विशाल पवार आदी सहभागी झाले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com