त्या मग्रुर अधिकाऱ्याच्या विरोधात आता दहा हजार जणांचा मोर्चा : तुरुंगातून टिळेकरांचा इशारा - Ten thousand people now march against that arrogant officer warns Tillekar from jail | Politics Marathi News - Sarkarnama

त्या मग्रुर अधिकाऱ्याच्या विरोधात आता दहा हजार जणांचा मोर्चा : तुरुंगातून टिळेकरांचा इशारा

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

याबाबत शहर भाजपने अटकेेचा निषेध केला असला तरी प्रत्यक्ष ज्या प्रश्नासाठी आंदोलन करावे लागले, ते सत्ता असतानाही सुटले नाही, हा मूळ प्रश्न कायम राहिला आहे. 

पुणे : पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असताना पाणीपुरवठ्यासाठी सत्ताधारी पक्षाच्याच नेत्यांना आंदोलनाची वेळ येते काय आणि त्यांना तातडीने तुरुंगातही जावे लागते काय, असा सारा घटनाक्रम काल घडला. माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह भाजपच्या चार नगरसेवकांना तुरुंगाची वारी घडली. यावरून पुणे पालिकेत भाजपला सत्ता राबवता येते नाही की, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

याबाबत शहर भाजपने अटकेेचा निषेध केला असला तरी प्रत्यक्ष ज्या प्रश्नासाठी आंदोलन करावे लागले, ते सत्ता असतानाही सुटले नाही, हा मूळ प्रश्न कायम राहिला आहे. 

हडपसर विधानसभा मतदारसंघ प्रभाग क्रमांक 38 व 41च्या पाणीप्रश्नां संदर्भात पाणी पुरवठा विभागातील मुजोर अधिकाऱ्यांच्या टिळेकर यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन झाले. यात गांधिगिरी करत अधिकाऱ्याला हारतुरे घालण्यात आले. पोलिसांना सरकारी कामात अडथळा आणण्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यात टिळेकर यांच्यासह त्यांच्या मातोश्री व नगरसेविका रंजना टिळेकर, राणी भोसले, ऋषाली कामठे आणि वीरसेन जगताप यांच्यासह 41 जणांना कोठडी मिळाली आहे.

या कारवाईचा शहर भाजपने निषेध केला आहे. टिळेकर यांनीही जनतेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागलं तरी माझी जाण्याची तयारी असल्याचे सांगत हा पाणीप्रश्न न सुटल्यास दहा हजार जणांचा मोर्चा नेण्याचा इशारा दिला आहे. 

त्यांच्या म्हणण्यानुसार मागील ४ महिन्यांपासून पाण्याच्या गंभीर समस्येमुळे कात्रज कोंढवा परिसरातील नागरिक त्रस्त होते, दोन-दोन दिवस पाणी न येणे, पाणी आले तरी अवेळी येणे. काही भागात तर पाणी मध्यरात्री पहाटे १-२ वाजता सोडले जात होते. अधिकार वर्गासोबत अनेक वेळी बैठका केल्या, व्हिजिट झाल्या, रोज फोन केले जात होते पण निष्क्रिय अधिकारी नगरसेवकांना विचारात न घेता मनाला वाटेल तसे आणि नागरिकांना त्रास होईल, असे पाणी वाटप करत होते. या सर्व कारणांमुळे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते घेऊन स्वारगेट पम्पिंग स्टेशनला गांधीगिरी आंदोलनाचे नियोजन केले. त्या अधिकाऱ्याची हार-फुले घालून आरती केली. परंतु मग्रूर अधिकाऱ्यामुळे आंदोलनला वेगळे वळण आले. त्या कारणाने आम्हाला व सर्वांना जवळ जवळ ५० कार्यकर्ते व ७ नगरसेवक यांना अटक झाली. काळजी नसावी असे ५६ गुन्हे नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टी आणि कार्यकर्ते अंगावर घेण्याची तयारी असते. मोर्चे आंदोलन हे माझ्या साठी नवीन नाही. जर पाणी प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला नाही तर १० हजार नागरिकांना घेऊन त्या मग्रूर अधिकारी च्या ऑफिसवर महामोर्चा होणार. मग किती लोकांवर गुन्हे दाखल करता बघूया, असा इशारा दिला आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख