Swaraj in our dream has not come : Hausatai Patil | Sarkarnama

आमच्या स्वप्नातील स्वराज आलंच नाही : हौसाताई पाटील 

संपत मोरे 
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

'स्वराज मिळावं आम्ही म्हणून लढलो. पण, आमच्या स्वप्नातील स्वराज आलंच नाही. इंग्रज या देशातून गेले. पण, इंग्रजांचा विचार गेला नाही. इंग्रज होते, तेव्हाही लोक उपाशी असायचे, आताही असतात,' असे मत 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी क्रांतिवीरांगणा हौसाताई भगवानराव पाटील यांनी व्यक्त केले. 

पुणे : "स्वराज मिळावं आम्ही म्हणून लढलो. पण, आमच्या स्वप्नातील स्वराज आलंच नाही. इंग्रज या देशातून गेले. पण, इंग्रजांचा विचार गेला नाही. इंग्रज होते, तेव्हाही लोक उपाशी असायचे, आताही असतात,' असे मत 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी क्रांतिवीरांगणा हौसाताई भगवानराव पाटील यांनी व्यक्त केले. 

"जीवावर उदार होऊन आमच्यासारखे अनेक लोक ब्रिटीश राजवटीविरोधात लढले, तुरुंगात गेले. हालअपेष्टा सहन केल्या. पण, आम्हाला जे राज्य हवं होतं, ते आलंच नाही,' असं सांगली जिल्ह्यातील हणमंतवडेय येथील 95 वर्षांच्या हौसाताई पाटील म्हणाल्या.  

दक्षिण महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार उभा राहिले होते. त्यात हौसाताई पाटील सहभागी झाल्या होत्या. वांगी येथील डाक बंगला जाळणे आणि सुरली घाटातील खजिना लूट या कामगिरीत त्यांचा सहभाग होता. 

'आज मूठभर लोकच मोठे झाले आहेत. गरीब गरीबच राहिला आहे. जे मोठे होते, ते मोठेच होत गेले. पण, गरीब माणूस मात्र भाकरीला महाग झाला आहे. प्रत्येक माणसाला पोटभर जेवण, राहायला घर मिळालं म्हणजेच स्वराज्य यासाठी आमची लढाई होती. मात्र, ते स्वराज्य आलंय का?' असा प्रश्न विचारून हौसाताई पाटील म्हणाल्या,"स्वराज आणि सुराज्य यासाठी आमची लढाई होती. मात्र, ते स्वराज्य आलं नाही आणि सुराज्यही आलं नाही.' 

"साने गुरुजी यांनी शेतकऱ्यांच्या राज्यासाठी हाक दिली. क्रांतीसिंह नाना पाटील यांनी "शेतकऱ्यांना घामाचे दाम द्या,' अशी मागणी केली होती. मात्र, शेतकऱ्यांच राज्य आलं नाही आणि घामाचे दाम मिळाले नाही. शेतकरी आत्महत्या करू लागला. हजारो शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून जीवन संपवले. हेच ते स्वराज का?

या स्वराज्यासाठी आमच्यासारखे तरुण तेव्हा जीवावर उदार होऊन लढले नव्हते. आम्हाला कष्टकरी, श्रमिक यांचं राज्य हवं होतं. ते स्वराज्य अजून आलं नाही, याचं दुःख वाटत आहे. पण, देशातील तरुण एक ना एक दिवस जागे होतील आणि लढा उभारून खर स्वातंत्र्य मिळवतील,' असा आशावाद हौसाताई पाटील यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा : मुलीच्या लग्नाचे वय वाढविण्याचे पंतप्रधानांचे संकेत 

नवी दिल्ली : माता मृत्यूदर रोखण्यासाठी मुलीच्या लग्नाचे वय वाढविण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातून दिले. याबाबत अभ्यास करण्यासाठी सरकारकडून नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल येताच मुलीच्या लग्नाच्या वयाबाबतचा योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही मोदी यांनी सांगितले. 

लाल किल्ल्यावर ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे देशाला उद्देशून भाषण झाले. त्यात त्यांनी अनेक घोषणा केल्या. त्यावेळीच त्यांनी मुलीच्या लग्नाच्या वयासंदर्भातही सूतोवाच केले. 

देशात सध्या मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षे इतके आहे. पण, अठरा वर्षांपर्यंत मुलीची शारीरिक वाढही झालेली नसते. तसेच, तिच्या शैक्षणिक वाटचालीत खंड पडतो. त्यामुळे अठरा वर्षांपर्यंत तिचे ना शिक्षण पूर्ण होते ना तिची शारीरिक वाढ होते, त्यामुळे मुलीच्या लग्नाच्या वयात वाढ होण्याची गरज या क्षेत्रात काम करणाऱ्यांकडून बोलून दाखवली जात होती. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख