आता हे कराच! सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री अन् अजितदादांकडे महत्त्वाची मागणी  - Supriya Sule's important demand to Chief Minister Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

आता हे कराच! सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री अन् अजितदादांकडे महत्त्वाची मागणी 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 8 जून 2021

उरवडे येथील एसव्हीएस अक्वा टेक्नॅालॅाजिस या सॅनिटायझर तयार करणाऱ्या रासायनिक कंपनीला काल दुपारी अडीचच्या सुमारास आग लागून, सतरा कामगार होरपळून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली.

पुणे : उरवडे येथील एसव्हीएस अक्वा टेक्नॅालॅाजिस या सॅनिटायझर तयार करणाऱ्या रासायनिक कंपनीला काल दुपारी अडीचच्या सुमारास आग लागून, सतरा कामगार होरपळून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली. या आधीही भंडरा येथील रुग्णाल्याला लागलेल्या आगीत १० बालकांचा मृत्यू झाला होता तर कोव्हिड केअर सेंटरला लागलेल्या आगीत ही अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटना वारंवार घडू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारकडे 'महाराष्ट्र राज्य अग्नीप्रतिबंधक दला'ची स्थापना करण्याची मागणी केली आहे. (Supriya Sule's important demand to Chief Minister Uddhav Thackeray)

हे ही वाचा : 'अच्छे दिव आले, पेट्रोल शंभर रुपये लिटर झाले'

या संदर्भात सुळे यांनी एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या की ''गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात घडलेल्या जळीतप्रकरणांत अनेक जणांचा बळी गेला. सोमवारी उरवडे, ता. मुळशी येथेही एका फॅक्टरीला आग लागून मोठी जिवितहानी झाली. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा 'महाराष्ट्र राज्य अग्नीप्रतिबंधक दला'ची आवश्यकता भासत आहे. राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार शहरी व निमशहरी भागांमध्ये अग्नीशमन यंत्रणा अस्तित्वात आहे. परंतु जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात ही यंत्रणा पुरेशा क्षमतेने कार्यरत नाही. परिणामी अशाप्रकारच्या घटना घडल्यानंतर जिवितहानी होण्याची शक्यता अधिक वाढते'', असे त्या म्हणाल्या आहेत.  

''म्हणूनच गेल्या २६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहून या त्रुटी दूर करण्यासंदर्भात तरतूदी असणारे 'महाराष्ट्र राज्य अग्नीप्रतिबंधक दल' स्थापन करण्याची मागणी केली होती. राज्यात सध्या कोरोनाची स्थिती असून सर्वच व्यवस्थांवर ताण आहे याची मला जाणीव आहे. परंतु तरीही उरवडे सारख्या घटना पुन्हा घडू नयेत व नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे. तरी कृपया आपण या मागणीबाबत सकारात्मक विचार करुन निर्णय घ्यावा ही नम्र विनंती'', असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 

हे ही वाचा : खासदाराशी वाद वाढवून राज्यपाल पडले तोंडघशी

दरम्यान, पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत १७  कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आले नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

Edited By - Amol Jaybhaye   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख