सुप्रिया सुळे यांनी नितीन गडकरींचे मानले आभार...  - Supriya Sule Union Minister Nitin Gadkari 25 crore fund sanctioned | Politics Marathi News - Sarkarnama

सुप्रिया सुळे यांनी नितीन गडकरींचे मानले आभार... 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 एप्रिल 2021

बारामती, इंदापूर, वेल्हा आणि पुरंदर तालुक्यातील रस्ते  उभारणीसाठी केंद्र सरकारने २५ कोटी निधी मंजूर केला आहे.

पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर, वेल्हा आणि पुरंदर तालुक्यातील विविध रस्त्यांची दुरुस्ती तसेच नव्याने रस्ते  उभारणीसाठी केंद्र सरकारने सुमारे २५ कोटी निधी मंजूर केला आहे. सुळे यांनी त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे. 

 आपल्या मतदार संघातील विविध रस्ते बांधणी, पूल उभारणी तसेच सध्याच्या काही रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने निधी जाहिर केला आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे.
 

निधी मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये बारामती व इंदापूर तालुक्याला जोडणाऱ्या  बारामती-जळोची-कण्हेरी-लाकडी-कळस-लोणी देवकर या रस्त्यासाठी ४ कोटी ९१लाख ४८ हजार (४९१.४८ लाख) रुपये मंजूर करण्यात आले आहेत.  इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द-वडापुरी-गलांडे वाडी नं. २ या रस्त्यासाठी ४ कोटी ९१ लाख ४ हजार (४९१.४ लाख) रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

पुरंदर तालु्क्यातील चांबळी कोडीत-नारायणपूर-बहिरटवाडी काळदरी या २८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ४ कोटी ९१लाख ३४ हजार (४९१.३४ लाख)  तर  सासवड-राजुरी-सुपा रस्त्यासाठी ४कोटी ९१लाख ४० हजार  (४९१.४० लाख) रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याबरोबरच वेल्हे तालुक्यातील महाड-मढेघाट-नसरापूर ते चेलाडी या ३१ किमी अंतराच्या रस्त्यासाठी ४ कोटी ८१ लाख ४४ हजार (४८१.४४ लाख) रुपये मंजूर झाले आहेत.
Edited by : Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख