सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून दुर्गम भागातील वस्ती होणार प्रकाशमान... - Supriya Sule Electricity will reach Bavdhane Vasti | Politics Marathi News - Sarkarnama

सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून दुर्गम भागातील वस्ती होणार प्रकाशमान...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

आठ दिवसात दुर्गम भागात असलेली बावधने वस्तीवर वीज पोहोचणार आहे.

पुणे : मुळशी तालुक्यातील लव्हार्डे गावाजवळ दुर्गम भागात असलेली बावधने वस्ती लवकरच प्रकाशमान होणार आहे.  खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले असून त्यांच्या सुचनेनुसार या वस्तीवर वीज पोहोवण्यासाठी काल प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. 

दोन महिन्यांपूर्वी सुळे यांनी गाव भेट दौऱ्यादरम्यान या वस्तीला भेट दिली होती. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी त्यांच्याकडे वीज पुरवठ्याबाबत मागणी केली होती. याची दखल घेत त्यांनी लागलीच महावितरणच्या मुळशी विभागाकडे या विषयाचा पाठपुरावा केला; आणि तातडीने येथे वीजपुरवठा करावा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार काल प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून महावितरणचे खांब बसविण्यात आले.  पुढील आठ दिवसात या वस्तीवर वीज पोहोचणार आहे.

 
राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती लोकसभा मतदार संघाचे समन्वयक प्रवीण शिंदे, मुळशी तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, महावितरणच्या मुळशी उपविभागाचे कार्यकारी अभियंता फुलचंद फड, सरपंच अस्मिता मारणे यांच्यासह नथू बावधने, समीर बावधने, शंकर धिंडले, दिलीप कदम, नंदू परींचेकर, संजोग काळे यांच्या उपस्थितीत काल प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

 

सुप्रिया सुळे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर, वेल्हा आणि पुरंदर तालुक्यातील विविध रस्त्यांची दुरुस्ती तसेच नव्याने रस्ते  उभारणीसाठी केंद्र सरकारने सुमारे २५ कोटी निधी मंजूर केला आहे. सुळे यांनी त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे. 
 
आपल्या मतदार संघातील विविध रस्ते बांधणी, पूल उभारणी तसेच सध्याच्या काही रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने निधी जाहिर केला आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख