सुप्रिया सुळेंनी पुण्यातील त्या पुलाचा प्रश्न लोकसभेत विचारला  - Supriya Sule asked the question of that bridge in Pune in the Lok Sabha | Politics Marathi News - Sarkarnama

सुप्रिया सुळेंनी पुण्यातील त्या पुलाचा प्रश्न लोकसभेत विचारला 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

रखडलेला रस्ता आणि भुयारी मार्गाचा विषय राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित केला.

दिल्ली : कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्गावरील नवले ब्रीज ते कात्रज दरम्यानच्या रखडलेला रस्ता आणि भुयारी मार्गाचा विषय राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित केला. त्यावर आगामी सहा महिन्यात हा प्रश्न निकालात निघेल, अशी ग्वाही केंदीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

कात्रज बाह्यवळण महामार्गावर नवले पुलाजवळ सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी, सातारकडील बाजूने दरी पुलावरून येणाऱ्या अवजड वाहनांना होणारे जीवघेणे अपघात, कात्रज बाजूकडे प्रलंबित राहिलेली रुंदीकरणाची कामे यांमुळे दिवसेंदिवस या महामार्गावरील वाहतूकीचे प्रश्न वाढतच चालले आहेत. याशिवाय सतत होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे.
 
या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन सुप्रिया सुळे या सातत्याने राष्ट्रीय रस्ते महामंडळ आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा करत आहेत. आज लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुन्हा त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. त्यावर नितीन गडकरी यांनी उत्तर देताना या भागातील एक भुयारी मार्ग पुढील काही दिवसांतच पूर्ण होणार असून, आणखी एका पुलाचे काम लवकरच सुरू होईल. तसेच रस्ता रुंदीकरण आणि इतर कामे सुद्धा आगामी सहा महिन्यांत पूर्ण होतील, अशी ग्वाही दिली.

हे ही वाचा...

शरद पवार पंतप्रधान व्हावेत हे स्वप्न नक्की साकार होईल : खासदार अमोल कोल्हे

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे. त्यामुळे देशातील जनतेला शाश्वत विकासाची आस आहे. त्यामुळे शाश्वत विकासाचे मॉडेल असलेल्या शरद पवारसाहेबांकडे देश आशेने बघतोय. पवार साहेब पंतप्रधान व्हावेत हे आमचे स्वप्न असून ते नक्की साकार होईल, असा विश्वास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, तुमचा तुमच्या स्वप्नावर विश्वास असेल तर ते नक्की साकार होते. शरद पवार साहेब पंतप्रधान व्हावेत, हे आमचे स्वप्न आहे. आमच्या स्वप्नावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ही केवळ माझीच इच्छा नाही तर प्रत्येक मराठी माणसाची आहे. पवार साहेब पंतप्रधान झाले तर प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल. प्रत्येकाने मनावर घेतले तर हे स्वप्न नक्की साकार होईल. 

मोदी सरकारने देशातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे. महागाईमध्ये 72 टक्क्यांची वाढ झाली आहे. 'अब की बार...' अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारच्या काळातील ही वाढ झाली आहे. दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. पण देशातील बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. रेल्वेच्या 63 हजार जागांसाठी लाखो अर्ज आले होते. महागाई, बेरोजगारी आणि तीच परिस्थती अर्थव्यवस्थेची आहे.

अर्थव्यवस्था सातत्याने गाळात चालली आहे. आत्मनिर्भर भारत ही घोषणा मुठभर भांडवलदारांच्याच फायद्याची आहे. आता शाश्वत विकासाची आस जनतेला आहे. या शाश्वत विकासाचे मॉडेल म्हणजे पवारसाहेब आहेत. देश पवारसाहेबांकडे आशेने बघतोय, असे कोल्हे यांनी सांगितले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख