राज्याचे पोलिस महासंचालक पुण्यात; पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची माहिती घेणार... - State Director General of Police in Pune will take information of pooja death case | Politics Marathi News - Sarkarnama

राज्याचे पोलिस महासंचालक पुण्यात; पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची माहिती घेणार...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे नियुक्ती झाल्यानंतर आज पहिल्यांदाच पुण्यात आले आहेत.

मुंबई : राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे आज पुण्यात दाखल झाले आहेत. ते दिवसभर पुण्यात असून पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची माहिती घेणार असल्याचे समजते. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही होणार असल्याने आजच्या त्यांच्या पुणे दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड अडचणीत सापडले आहेत. त्यांना वाचविण्यासाठी पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात नाही. पोलिस योग्यप्रकारे तपास करत नसल्याचे आरोपही विरोधकांनी केले आहेत. या प्रकरणावरून विरोधकांकडून पुणे पोलिसांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे राज्याच्या पोलिस महासंचालकांचेही या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष आहे. 

हेही वाचा : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा यवतमाळमध्ये तपास...

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे पोलिसांकडून यवतमाळमध्येही याप्रकरणाचे धागेदोरे शोधले जात आहेत. या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे आज पुण्यात आले आहेत. महासंचालक पदी नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच पुण्यात आले आहेत.

पूजाच्या मृत्यू प्रकरणाचा आतापर्यंत झालेल्या तपासाठी माहिती ते पुणे पोलिसांकडून घेण्याची शक्यता आहे. तसेच आवश्यकतेनुसार तपासाबाबत सुचनाही दिल्या जातील, असे समजते. त्यामुळे नगराळे यांच्या आजच्या पुणे दौऱ्याला महत्व आले आहे. 

दरम्यान, राठोड यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेतच दोन गट पडल्याचे समजते. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप झाले होते. विरोधकांनी त्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली होती. पण मुंडेंनी सोशल मिडियावर आपली बाजू मांडली. त्यांनी अखेरपर्यंत राजीनामा दिला नाही. हाच मुद्दा पुढे करून शिवसेनेतील एक गट राठोड यांच्या राजीनाम्याच्या विरोधात असल्याचे समजते. त्यांनी राजीनामा दिल्यास आरोप मान्य केल्यासारखे होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. 

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी मात्र राठोड यांच्यावरून शिवसेनेत दोन गट नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ''मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राठोड यांच्या राजीनाम्याचा निर्णय सरकारमधील प्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेतील. त्यावरून शिवसेनेत कोणतेही गट नाहीत.''

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख