'सोमेश्वर' चे पेटलेले राजकारण एकदम शांत ... - Someshwar burning politics calmed down BJP Panel chief Dilip Khaire disqualified | Politics Marathi News - Sarkarnama

'सोमेश्वर' चे पेटलेले राजकारण एकदम शांत ...

संतोष शेंडकर
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

मैदानात उतरलेल्या ५३८ इच्छुकांचाही हिरमोड झाला आहे. 

सोमेश्वरनगर (पुणे) : राज्य निवडणूक प्राधीकरणाने हिरवा कंदील दाखवल्याने सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम १५ फेब्रुवारीपासून सुरू झाला होता. परंतु निवडणुक ऐन रंगात आलेली असतानाच कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असल्याच्या कारणावरून पाचव्यांदा निवडणूक ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. यामुळे सभासदांचा आणि मैदानात उतरलेल्या ५३८ इच्छुकांचाही हिरमोड झाला आहे. 

याशिवाय पुणे जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ यांच्यासह बाजार समित्या व साखर कारखान्यांचे निवडणूक कार्यक्रम तोंडावर असताना पुढे ढकलले जाणार आहेत. 

आधी कर्जमुक्तीच्या नावाखाली आणि त्यानंतर साथरोग अधिनियमाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुका वेळोवेळी पुढे ढकलण्यात आल्या. १८ मार्च, १७ जून, २८ सप्टेंबर अशा दिवशी राज्य सरकारने काढलेल्या आदेशांनुसार डिसेंबर २०२० अखेर निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. १६ जानेवारीला चौथा आदेश काढून निवडणुका ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या. परंतु ग्रामपंचायत निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्यानंतर सहकारी संस्थांच्याही निवडणुका घेता येतील अशी खात्री बाळगून १६ जानेवारीचा आदेश रद्द करण्यात आला. त्यामुळे राज्यातील ४७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याचा मार्ग मोकळा झाला. यानुसार सातारा जिल्हा बँक, परभणी जिल्हा बँक, बीड जिल्हा बँक, औरंगाबाद जिल्हा बँक यांचे निवडणूक कार्यक्रमही जाहीर झाले. 

याशिवाय सोमेश्वर, कृष्णा, कीसनवीर अशा साखर कारखान्यांचेही निवडणूक कार्यक्रम १५ फेब्रुवारीपासून सुरू झाले होते. तर पुणे जिल्हा बँक, पुणे जिल्हा सहकारी दूध संघ, चार कृषी उत्पन्न बाजार समित्या तसेच छत्रपती, कर्मयोगी, घोडगंगा, भीमाशंकर, भीमा पाटस, राजगड या साखर कारखआन्यांच्या निवडणुकाही येऊ घातल्या होत्या. या संस्थांचे सभासद निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची वाट पहात होते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने निवडणुका ३१ मार्च २०२० पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परंतु ज्या संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च वा उच्च न्यायालयाने घेण्याचे आदेश दिले आहेत अशा ३८ सहकारी संस्थांच्या निवडणुका मात्र घेतल्या जाणार आहेत. तसेच २५० पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रियाही पुढे चालू राहणार आहे. त्यामुळे ज्यांच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशाने होत आहेत. त्या पुढे चालू राहतील आणि अन्य संस्थाच्या मात्र रखडणार आहेत.  

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुक तर फारच दुर्दैवी ठरली आहे. कारण १ फेबुवारी २०२० रोजी सोमेश्वर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानंतर जिल्ह्यातील सात सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका पाठोपाठ येणार होता. पण १ फेब्रुवारीलाच दिवशी कर्जमाफीच्या कामात सरकारी यंत्रणा व्यस्त असल्याच्या कारणाने निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. त्यानंतर तीन वेळा कोरोनाच्या प्रादुर्भावाचे कारण पुढे येत निवडणूक पुढे ढकलली. आता १५ तारखेला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता आणि २२ तारखेपर्यंत तब्बल ६३२ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. कालच २३ तारखेला छाननी होऊन ९४ अर्ज बाद झाले होते. भाजप नेते दिलीप खैरे यांचा अर्ज बाद झाला होता. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या या निर्णयाविरोधात त्यांनी विभागीय सहनिबंधक यांच्याकडे अपिलही केले. 

सोमेश्वरचे विद्यामान अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, माजी अध्यक्ष शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे, जिल्हा परिषदेचे विद्यमान बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, माजी सभापती दत्ताजी चव्हाण, भाजप नेते दिलीप खैरे असे दिग्गज या निवडणुकीत उतरल्याने रंगत निर्माण झाली होती. शेतकरी कृती समिती व भाजप या दोघांनी स्वतंत्रपणे राष्ट्रवादीच्या पॅनेलला आव्हान देण्याची तयारी केल्याने लढत दुरंगी होणार की तिरंगी याच्या चर्चांचे पेव फुटले होते. परंतु राज्यसरकारने ३१ मार्चपर्यंत आहे त्या टप्प्यावर निवडणुका थांबविण्याचा निर्णय घेतल्याने सोमश्वरच्या कार्य़क्षेत्रात अचानक शांतता पसरली असून सभासद आणि इच्छुकांचाही बेरंग झाला आहे. ग्रामपंचायत, विधानसभा, पदवीधर अशा निवडणुका होतात आणि कारखान्याच्या का थांबतात? असे प्रश्नचिन्ह पडू लागले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख