पाटस (जि. पुणे) : काही मंडळी म्हणत होती, महाविकास आघाडीचे सरकार नऊ दिवस पण टिकणार नाही. पण, परवा दिवशी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन वर्ष होईल. सध्या विरोधकांना तर सरकार पडल्याचे सारखे स्वप्न पडते. पण एखाद्याविषयी वाइट स्वप्न पडले की उलट त्याचे चांगलेच होते. तसेच विरोधकांच्या स्वप्नामुळे आपल्या सरकारचे आयुष्य वाढतच जाणार आहे, असा टोमणा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला आणि त्यांच्या नेत्यांना लगावला.
महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पाटस (ता. दौंड) येथे कार्यकर्त्यांच्या आयोजित बैठकीत सुळे बोलत होत्या.
या वेळी पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, आमदार संजय जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, जिल्हा परिषद सभापती सारिका पानसरे, पंचायत समिती सभापती आशा शितोळे, राणी शेळके, शिवसेनेचे नेते महेश पासलकर, लक्ष्मण सातपुते, सोहेल खान, रामभाऊ टुले, विकास खळदकर, हरीश ओझा आदी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, विरोधी भाजप उमेदवाराच्या घरासमोर लोक आंदोलन करीत आहे. त्यामुळे तुम्हाला न्याय देणारा माणूस पाहिजे का गरीबांवर अन्याय करणारा, हे लक्षात ठेवा.
दरम्यान, जिल्ह्यात एक-दोन साखर कारखाने सोडले, तर इतरांनी चांगला बाजारभाव दिला. दौंड तालुक्यातील भीमा पाटस साखर कारखान्यासाठी काही नेत्यांनी हेलिकॉप्टरने येऊन कोट्यवधी रुपये दिले होते. तरी, पण साखर कारखाना चालू झाला नाही, असा टोमणाही खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार राहुल कुल यांना लगावला.
माजी आमदार रमेश थोरात म्हणाले, कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क साधून मतदान करुन घेतले, तर आपल्याला अडचण येणार नाही. त्यादृष्टीने सर्वांनी काम करा. तालुक्यातुन 80 टक्के मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होईल.
जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, चांगले काम करायचे असेल, तर दोन्ही जागा महाविकास आघाडीच्या असणे गरजेचे आहे. पक्षासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसून काम केले पाहिजे.
तालुक्याध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी तालुक्यातील मतदानाविषयी कार्यकर्त्यांना सविस्तर सांगितले. विकास खळदकर, भालचंद्र शितोळे यांनी सूत्रसंचालन केले.

