आशिषजी, ते पहायला मिळणे ह्यालाही भाग्य लागते  ः राज ठाकरे

बाबासाहेब पुरंदरे हे जरी आपल्याला इतिहास सांगत असले तरी वर्तमानात कसे भानावर यावे, हे आपल्याला सांगत असतात.
Shivshahir Babasaheb Purandare felicitated in Pune
Shivshahir Babasaheb Purandare felicitated in Pune

पुणे : शिवाजी महाराजांची भूमिका करणारी व्यक्ती एकदा आजारी पडली होती. त्यावेळी शिवसृष्टीत एकदा महाराजांच्या भूमिकेतही मी बाबासाहेब पुरंदरे यांना पाहिले होते. बाबासाहेबांचे कलाकरांचे रूपही मी पाहिले आहे. आता आशिष शेलार यांनी बाबासाहेब यांची रुपं सांगितली. त्यातील कलाकरांचे रूप तुम्ही कदाचित कधी पाहिले नसेल. पण मी ते पाहिले आहे आणि ते पहायला मिळणे ह्यासाठीही भाग्य लागते, अशा शब्दांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कौतुक केले. (Shivshahir Babasaheb Purandare felicitated in Pune)

ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप आमदार आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवशाहीर पुरंदरे यांचा पुण्यात सत्कार करण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते. अर्ध्या झाकलेल्या आणि अर्ध्या उघड्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो...अशा हलक्या फुलक्या शब्दांत राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. त्याचवेळी व्यासपीठासह उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

राज ठाकरे म्हणाले की, आज पुण्यातील शिवसृष्टीवर येताना मला बाबासाहेब पुरंदरे यांनी १९७४ मध्ये शिवतीर्थवर साकारलेली शिवसृष्टी आठवली, त्यावेळी मी सहा वर्षांचा होतो. त्या शिवसृष्टीत मी दररोज जाऊन शिवराज्यभिषेक सोहळा पाहत असे. त्यावेळी पहिल्यांदाच बाबासाहेब हे भवानी तलवार घेऊन आले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्या भवानी तलवारीच्या स्वागतासाठी मी गेलो होतो. सहा वर्षांचा असताना मी बाबासाहेबांना पहिल्यांदा पाहिले. तेव्हापासून मी त्यांना वाचत होतो, ऐकत होतो. त्यानंतर आजपर्यंत मी त्यांच्या सहवासात राहू शकलो, त्यांना पाहू शकलो, त्यांच्याकडून ही गोष्टी शिकू शकलो. 

‘‘बाबासाहेबांना विविध ठिकाणी भेटलो, मला पडलेले प्रश्न समजून घेतले. बाबासाहेब पुरंदरे हे जरी आपल्याला इतिहास सांगत असले तरी वर्तमानात कसे भानावर यावे, हे आपल्याला सांगत असतात. इतिहासातील चांगल्या गोष्टी घेण्याचे आणि चुका सुधारण्याबाबतही ते सांगत असतात. ते ज्या पद्धतीने इतिहास सांगतात, त्यामुळे एखादा स्क्रू फिट व्हावा, तसा तो इतिहासाचा प्रसंग डोक्यात फिट होऊन जातो, असेही राज म्हणाले. 

ठाकरे यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांच्या पत्रातील एक दाखला सांगताना ते ओरडून सांगतात. ‘कारभार ऐसा करणे की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात न लगणे.’ त्यानंतर ते हळू आवाजात सांगतात की, इतके जोरात ओरडूनही आपल्या मनाला ते कधी कळणार आहे की नाही. ते पुढे म्हणतात की आजही मला असं वाटतं की हे वाक्य प्रत्येक मामलेदार कचेरीत कोरून ठेवावे. इतिहासाबरोबरच वर्तमानाची जाग आणणारे बाबासाहेब आहेत. शिवचरित्र आपण नुसताच इतिहास म्हणून वाचण्यात काही अर्थ नाही. त्या इतिहासातून बाबासाहेब काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. ते आपण समजून घेतले तर घेतली नाही तर फक्त इतिहासच राहतो. इतिहास समजेल, आवडेल अशा पद्धतीने ते आपल्याला सांगत असतात. इतिहासाकडे कशा पद्धतीने पाहावे, हे बाबासाहेबांकडे पाहून कळते.

आमच्या नातवंडे, पतवंडांनीसुद्धा तुमच्याकडून इतिहास ऐकावा

शिवचरित्र अनेकांनी लिहिले आहे. पण, बाबासाहेब पुरंदरे यांनी ते घराघरांत, मनामनांत पोचवले. ते केवळ महाराष्ट्रातच नव्हे; तर देशभर पोचवले. जे आपला इतिहास विसरले होते, त्यांना आपल्या इतिहासाची जाणीव करून दिली. बाबासाहेबांनी असाच इतिहास सांगत राहावे आणि आमची नातवंडे पतवंडेसुद्धा तुमच्याकडून इतिहास ऐकतील, इतके आयुष्य तुम्हाला लाभो, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी पुरंदरे यांच्या सत्कार समारंभात ईश्वरचरणी प्रार्थना केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com