शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपमध्ये जाण्याचे निमित्त शोधत आहेत

आढळराव यांच्यामुळेच विमानतळ, एसईझेड असे मोठे प्रकल्प खेड तालुक्यात झाले नाहीत आणि तालुका विकासात मागे राहिला.
Shivajirao Adhalrao Patil is looking for an excuse to join BJP : Dilip Mohite
Shivajirao Adhalrao Patil is looking for an excuse to join BJP : Dilip Mohite

राजगुरूनगर (जि. पुणे) : शिवाजीराव आढळराव पाटील हे लोकसभेची निवडणूक हरले आहेत. या पुढेही त्यांना शिवसेनेकडून तिकीट मिळणार नाही, म्हणून ते नैराश्यग्रस्त झाले आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यासाठी निमित्त पाहिजे, म्हणून खेड पंचायत समितीच्या इमारतीचा विषय घेऊन ते नौटंकी करीत आहेत आणि जाणीवपूर्वक गरळ ओकत आहेत, अशी तिखट टीका आमदार दिलीप मोहिते यांनी केली. 

दरम्यान, शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही पाठिंबा देतोय आणि हे इथे आम्हाला विरोध करताहेत, हा कुठला न्याय? असा सवालही त्यांनी केला. खेड तालुक्याच्या विकासाला विरोध करण्याचे धोरण आढळरावांचे राहिले असून त्यांच्यामुळेच विमानतळ, एसईझेड असे मोठे प्रकल्प तालुक्यात झाले नाहीत आणि तालुका विकासात मागे राहिला, असाही आरोप मोहिते यांनी केला. 

खेड तालुका पंचायत समितीच्या इमारतीसंदर्भात शनिवारी (ता. १३ मार्च) पत्रकार परिषद घेऊन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आमदार मोहितेंवर टीका केली होती. त्याबाबत रविवारी (ता. १४ मार्च) पत्रकार परिषद घेऊन मोहिते यांनी प्रत्युत्तर दिले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, अरुण चांभारे आदी उपस्थित होते. 

मोहिते म्हणाले, ‘‘आढळराव अजूनही पराभव पचवू शकले नाहीत. त्यात आता महाविकास आघाडी झाल्याने पुढच्या वेळी शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचाच उमेदवार असणार आहे. यामुळे ते नैराश्यग्रस्त झाले आहेत. इकडे तिकीट मिळणार नसल्याने ते भाजपत जाण्याची तयारी करीत आहेत. त्यासाठी खेड पंचायत समिती इमारतीचे निमित्त शोधून राजीनाम्याची आणि आंदोलनाची भाषा करीत नौटंकी करीत आहेत.’’

सध्या इमारत प्रस्तावित असलेल्या जागेत खेड तालुक्याची प्रशासकीय इमारत करायची आहे. तालुक्याच्या अधिकाऱ्यांना बसायला जागा नाही, पार्किंग नाही, टॉयलेट्स नाहीत. त्यासाठी 21 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पण खेड तालुक्याचा विकास म्हटले की आढळरावांचा विरोध ठरलेला आहे. त्यांनीच विमानतळ, एसईझेड, एमआयडीसीला विरोध करून, तालुका मागे नेऊन ठेवला. तालुक्याच्या विकासात यांचे काहीही योगदान नाही, मग विरोधाला कसे पुढे येता?

आमच्या तालुक्याची इमारत, आम्ही बघू काय करायचं ते. आंबेगाव तालुक्यात झेडपीची जागा प्रांत कार्यालयाला दिली, तिथे का आढळराव विरोध करीत नाहीत? पंचायत समितीच्या काही विभागांच्या इमारती केवळ 10 वर्षांपूर्वीच्या आहेत. समितीचे कामकाज, आहे त्या इमारतीत सध्या व्यवस्थित चालू आहे. शिवाय जुन्या क्वार्टर्सच्या जागेत मंजूर 5 कोटी फंडातून नवीन इमारतही बांधता येईल. त्या इमारतीला माजी आमदार (स्व.) सुरेश गोरे यांचे नाव देण्यास माझी काहीही हरकत नाही. 

आढळरावांना खेड पंचायत समितीत त्यांच्याच पक्षाचे लोक विचारत नाहीत. पंचायत समितीचा सभापती, उपसभापती त्यांच्या मताप्रमाणे होत नाही आणि ते कसला इमारतीचा विषय घेऊन बसलेत. सध्याचे सभापती भगवान पोखरकर यांना आघाडी धर्म पाळून आम्ही मदत केली तेव्हा ते सभापती झाले. त्यावेळी ते आमच्या पाया पडायला आले होते. आज त्यांनी आमच्यावर टीका करणे, योग्य नाही, असे आमदार मोहिते यांना नमूद केले. 

खेड पंचायत समितीच्या इमारतीसाठीची जागा महसूल विभागास देण्यास सभागृहाने बहुमताने ठराव मंजूर केला. एकट्या अध्यक्षांच्या मनावर काही नसते, असे स्पष्टीकरण पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिले. 

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटीलअयांनी स्वतःच्या 96 एकर जमिनीसाठी खेड घाटाचे बाह्यवळण त्या बाजूने घेतले, असा आरोप  राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सांडभोर यांनी केला. 


दिलीप मोहिते म्हणाले

►आढळराव यांनी अपशब्द वापरले, पण त्यांच्या वयाचा मान ठेवून आम्ही तसे बोलणार नाही. 
►आमच्यामुळे शिवसेना सत्तेत याची जाण ठेवा. 
►आपल्याच पक्षाचे सरकार असताना आंदोलन कसले करता? राष्ट्रवादीही रस्त्यावर उतरू शकते, पण आम्ही भान ठेवतो. 
►जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे कमर्शियल पुढारी, जो आमदार त्याच्यामागे जातात. 
►राम गावडे, अमृता गुरव यांना का सोडून गेले? कोणाही शिवसेना कार्यकर्त्याला यांनी मोठे केले नाही. 
►शिवसेनेचे काही पंचायत समिती सदस्य आणि पदाधिकारी याबाबत माझ्याबरोबर आहेत. 
►अधिकाऱ्यांच्या समितीने प्रशासकीय इमारतीसाठी जागा योग्य असल्याचा अहवाल दिला. 
►आढळरावांची तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे करणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com