मुख्यमंत्री शिवसेनेचे असले तरी त्यांच्यावर पवारांचा वरदहस्त : डॉ. कोल्हे 

अशा अनेक कामांचे अपश्रेय घ्यायलाही आढळरावांनी पुढे यावे.
Shiv Sena's Uddhav Thackeray became the Chief Minister because of Sharad Pawar : Dr. amol kolhe
Shiv Sena's Uddhav Thackeray became the Chief Minister because of Sharad Pawar : Dr. amol kolhe

राजगुरूनगर (जि. पुणे) : शिरूर (Shirur) मतदारसंघात शिवसेनेने (Shiv Sena) सुरू केलेले शिवसंपर्क अभियान हे पक्षवाढीसाठी नसून फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसवर (Nationalist Congress) टीका करण्याचा कार्यक्रम आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्यामुळे शिरूर मतदारसंघात महाविकास आघाडी राहिली नाही. खरंतर निवडणूक झाल्यावर राजकारण विसरून विकासकामे केली पाहिजेत. मुख्यमंत्री (Chief Minister) शिवसेनेचे असले तरी त्यांच्यावर ज्येष्ठ नेते शरद पवारांचा (Sharad Pawar) वरदहस्त आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. amol kolhe) यांनी आढळरावांना सुनावले.  

पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बाह्यवळणाचे उद्‌घाटन खासदार अमोल कोल्हे व आमदार दिलीप मोहिते यांच्या उपस्थितीत देवराम थिगळे व अन्य शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा : वयस्कर माणसाने पोरकटपणा करून हसू करून घेऊ नये : कोल्हेंची आढळरावांवर बोचरी टीका...

ते म्हणाले की, विमानतळ गेला, वाहतूक कोंडी सोडविता आली नाही, रेल्वेचे काम सुरू करता आले नाही, बैलगाडा प्रश्न सोडविता आला नाही, चाकण शिक्रापूर रस्ता करता आला नाही, पुणे नाशिक चौपदरीकरण रखडले, पुढे सहापदरीकरण करता आले नाही. अशा अनेक कामांचे अपश्रेय घ्यायलाही आढळरावांनी पुढे यावे. अगोदरच रस्त्याचे उद्घाटन करण्याचा पोरकटपणा राजकारणातील सुसंस्कृतपणाला शोभत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 

डॉ. कोल्हे म्हणाले, ‘पुणे-नाशिक रेल्वेमार्ग व्हावा, ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांची इच्छा होती. त्याचे सर्वेक्षण सुरेश कलमाडी यांच्या काळापासून सुरू आहे. तीन वेळा निवडून दिल्यावर त्याचा पाठपुरावा करणे, माजी खासदारांचे कर्तव्यच होते. त्यांचे सरकार असतानाही त्यांना रेल्वेचा डीपीआर सभागृहापुढे आणता आला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकारच्या २० टक्के भागीदारीला मान्यता दिली. त्यानंतर मी पाठपुरावा केला व काम मार्गी लागले. पण मला कशाचे श्रेय घ्यायचे नाही. मी लोकांचा सेवक आहे आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत राहणार आहे.' 

खेड घाटाच्या कामाचे खरे श्रेय नितीन गडकरींचे

खेड घाटाच्या कामाचे खरे श्रेय नितीन गडकरींचे आहे. कार्यादेश मी खासदार झाल्यावर निघाले. आढळरावांच्या काळात आराखडा झाला. त्यात स्वतःच्या हितसंबंधांतील जमिनीच्या सोयीसाठी व शाळा वाचविण्यासाठी त्यांनी हे बाह्यवळण सध्याच्या बाजूने घेतले आणि ते अडीच किलोमीटरऐवजी साडेचार किलोमीटरचे झाले.  मोशी ते राजगुरुनगर सहापदरीकरणाच्या ६६० कोटींच्या कामाची निविदा झाली आहे. तळेगाव ते शिक्रापूर चौपदरीकरणासाठी ६०० कोटी मंजूर झालेत. उरण- पनवेल- भीमाशंकर-शिरूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग होणार आहे, असे कोल्हे यांनी स्पष्ट केले. 

शिरूरचे पुढचे खासदारही कोल्हेच होणार

शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे खेड तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये भांडणे लावायची कामे करतात. ते आंबेगाव तालुक्यातील विकासकामांना विरोध करत नाहीत. मात्र, खेड तालुक्यात सतत विरोध करतात. मुख्यमंत्री शिवसेनेचे असल्याने एखादे तरी काम खेड तालुक्यात आणायला पाहिजे होते. व्यवसाय खेड तालुक्यात करतात. पण खेड तालुक्यात कामे काही आणली नाहीत. शिरूर मतदारसंघातही फक्त आश्वासनांची खैरात केली. कामांच्या फक्त कल्पनाच मांडल्या. याउलट खासदार कोल्हे प्रत्यक्षात कामे करत आहेत. म्हणून शिरूरचे पुढचे खासदारही डॉ. अमोल कोल्हेच होणार आहेत, असे आमदार दिलीप मोहिते यांनी स्पष्ट केले. 


आढळरावांचे पोलिस संरक्षण काढून घ्यावे

आढळरावांनी आधीच घाटाच्या कामाचे उद्‌घाटन करून केलेल्या नौटंकीचा आम्ही निषेध करतो. ओरिजिनल ॲक्टर असलेले कोल्हे यांना अभिनय शोभतो. पण, ते खासदार झाल्यानंतर डुप्लिकेट ॲक्टर आढळराव यांनी ड्रामा करायला सुरुवात केली आहे. कायदा हातात घेतला, म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांना विनाकारण दिलेले पोलीस संरक्षण काढून घ्यावे. ते स्वतःच भाई झालेत, त्यामुळे त्यांना संरक्षणाची गरज नाही.

यावेळी अध्यक्षा निर्मला पानसरे, संजय काळे, दिलीप मेदगे, कैलास सांडभोर,  विनायक घुमटकर, अरुण चांभारे, अनिल राक्षे, चंद्रकांत इंगवले, दिनेश कड, नवनाथ होले, रामदास ठाकूर, अरुण थिगळे, सुभाष होले, उमेश गाडे, संध्या जाधव, मनीषा सांडभोर, मनीषा टाकळकर, आशा तांबे आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com