शिवसेनेचा आदिवासी नेता लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार - Shiv Sena's Pune Zilla Parishad member Devram Lande will soon join NCP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

शिवसेनेचा आदिवासी नेता लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार

दत्ता म्हसकर
शनिवार, 19 जून 2021

लांडे यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेला आदिवासी भागात धक्का बसणार आहे.

जुन्नर (जि. पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेनेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि आदिवासी नेते देवराम लांडे यांनी आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. लांडे यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेला आदिवासी भागात धक्का बसणार आहे. कारण लांडे यांचे या भागात चांगलेच प्राबल्य आहे. (Shiv Sena's Pune Zilla Parishad member Devram Lande will soon join NCP)

जुन्नर तालुक्यातील देवळे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार अतुल बेनके यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे देवराम लांडे नावाच्या आदिवासी वादळाची लवकरच घरवापसी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : आदिवासी पट्टयांसाठी नरहरी झिरवळांनी थेट दिल्ली गाठली!

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मागील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २०१६ मध्ये देवराम लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला हेाता. शिवसेनेच्या तिकिटावर ते जुन्नर तालुक्यातील पाडळी निरगुडे या गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी त्यांचे मतभेद झाल्याने त्यांनी त्यावेळी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला होता.  

शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यापासून देवराम लांडे हे अपेक्षापूती न झाल्याने शिवसेनेत नाराज होते. आपली नाराजी त्यांनी वेळीवेळी दाखवून दिली होती. मात्र, पक्षनेतृत्वाने त्यांची फारशी गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांचे उच्चशिक्षित सुपुत्र केवाडीचे सरपंच अमोल लांडे यांनी नुकताच आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँगेस पक्षात जाहीर प्रवेश केलाआहे. त्यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

देवराम लांडे तेव्हापासून तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेत राहिले असले तरी मनानं ते केव्हाच पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे झाले होते. त्यांच्या निर्णयामुळे आदिवासी भागातील राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक बळकटी प्राप्त होणार आहे. आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या बळात देखील वाढ होईल, असा विश्वास पक्षातील नेत्यांकडून व्यक्त होत आहे. देवराम लांडे यांच्या या निर्णयामुळे विरोधक मात्र यामुळे सुखावले आहेत. आता पुढील उमेदवारी आपणास मिळणार म्हणून जोमाने कामास लागले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशासंदर्भात बोलताना देवराम लांडे म्हणाले की, माझ्यासारख्या सर्वसामान्य युवकाला माजी आमदार वल्लभ बेनके यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले होते. काही कार्यकर्त्यामुळे मी पक्षापासून दूर गेलो होतो. पण आता चूकभूल देणे-घेणे. मी लवकरच स्वगृही परतणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख