आढळराव म्हणतात, घरात घुसून मारू; तर ठोशास ठोसा देण्याचे राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर 

आमदार ऍड. अशोक पवार व कारखान्याचे संचालक तथा शिवसेनेचे शिरूर तालुका प्रमुख सुधीर फराटे यांच्यात बाचाबाची झाली.
Shiv Sena - NCP warns each other in Shirur
Shiv Sena - NCP warns each other in Shirur

शिरूर : राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील वाद शिरूर तालुक्‍यात काही केल्या थांबायला तयार नाही. तालुक्‍यातील घोडगंगा साखर कारखान्याच्या साखर वाटपाच्या पुण्यातील कार्यक्रमात आमदार अशोक पवार यांच्याकडून मारहाण झाल्याचा आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे यांनी केला. आमदार पवारांनी मात्र त्याचा इन्कार केला. 

दरम्यान, असा पुन्हा प्रकार झाल्यास घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी वाघोलीतील सभेत दिला. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांनी "पराभव झालेल्या आढळराव यांनी आता विश्रांती घ्यावी,' असा सल्ला देत "आमदार पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्यास ठोशाला ठोशानेच उत्तर दिले जाईल,' असे प्रत्युत्तर दिले. 

रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पुण्यातील सभासदांना साखर वाटपाच्या पुण्यात झालेल्या कार्यक्रमात कारखान्याचे अध्यक्ष आमदार ऍड. अशोक पवार व कारखान्याचे संचालक तथा शिवसेनेचे शिरूर तालुका प्रमुख सुधीर फराटे यांच्यात बाचाबाची झाली. आमदार पवार यांनी पत्नी व मेहुण्यासह हल्ला केल्याचा फराटे यांचा आरोप आहे. आमदार पवार यांनी हा आरोप फेटाळून लावला. फराटे यांनीच चांगल्या कार्यक्रमात गोंधळ घातल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

सुधीर फराटे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काल मांडवगणमध्ये काही काळ बंद पाळण्यात आला. निषेध रॅली काढून घेतलेल्या सभेला भाजपचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, जिल्हा सरचिटणीस श्‍यामराव चकोर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

या सभेत अशोक पवार यांचा निषेध झाल्याने त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज (ता. 8 नोव्हेंबर) येथील बाजार समितीच्या सभागृहात निषेध सभा घेतली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा संगीता शेवाळे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, उपसभापती विकास शिवले, शिरूर खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, संचालक सुरेश पाचर्णे, घोडगंगा कारखान्याचे संचालक बाबासाहेब फराटे, पंडीत दरेकर, अनिल भुजबळ, मुजफ्फर कुरेशी आदी यावेळी उपस्थित होते. 

अशोक पवार यांच्या रूपाने विकासाभिमुख नेतृत्व शिरूर तालुक्‍याला लाभले असून, त्यांच्या विकासाच्या वाटेत अडथळे आणण्याचा, स्टंटबाजी करून त्यांच्या चांगल्या कामाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्यास ठोशास ठोसा उत्तर दिले जाईल, असा इशारा काळे यांनी या वेळी दिला. आमदार अतिशय तडफेने, जिद्दीने विकासासाठी झटत असताना खोटे चित्र रंगवून चिखलफेक करणे उचित नाही. तुम्हाला त्यांना विरोध करायचा असेल तर कारखान्याच्या आगामी निवडणुकीत लोकशाही मार्गाने लढा, असे छुपे हल्ले कशाला करता, असे ते म्हणाले. 

ती निषेध सभा भाजपपुरस्कृत होती : रवीबापू काळे 

शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर टीका करताना, "पराभवाच्या धक्‍क्‍यातून न सावरलेल्या आढळरावांनी थोडी विश्रांती घ्यावी', असा उपरोधिक सल्ला दिला. शिवसेना तालुकाप्रमुखावर हल्ला झाला असेल, तर त्या निषेध सभेला शिवसैनिक नकोत का? ती निषेध सभा भाजप पुरस्कृत होती, असा आरोपही त्यांनी केला. 

तुमचा उद्दामपणा उतरवू : आढळराव 

शिवसेनेच्या तालुकाप्रमुखाला मारहाण करण्याच्या प्रकाराचा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी वाघोली येथील सभेत निषेध केला. साखर कारखान्याच्या माध्यमातून उद्दामपणा वाढलेल्यांनी मस्तीत राहू नये. कारखाना चालवता; म्हणजे खूप मोठे झाल्यासारखे वागू नये. कारखाना कसा चालवता ते आधी पहा. सत्ता आली म्हणजे आभाळ ठेंगणे झाले, असे समजून चालणार असाल तर उद्दामपणा उतरवू. शिवसेनेच्या तालुकाप्रमुखावर हात उचलण्यापर्यंत, त्यांना मारहाण करण्यापर्यंत मजल जाणारांचा निषेध असून, पुन्हा असा प्रयत्न झाला तर आम्ही गप्प बसणार नाही. आमच्याकडे काही नाही, असे समजू नका. खासदार-आमदार नसतील; पण म्हणून त्यामुळे आमचे अडणार नाही. परत असे झाल्यास घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com