शिवसेना नेत्यांनी घातले बारामतीत लक्ष : बारणे, आढळरावांचा नुकसान पाहणी दौरा  - Shiv Sena leaders pay attention in Baramati: Barne, Adhalrao's damage inspection tour | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना नेत्यांनी घातले बारामतीत लक्ष : बारणे, आढळरावांचा नुकसान पाहणी दौरा 

गणेश कोरे 
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

राज्यातील सत्तेत एकत्र असताना शिवसेना नेत्यांनी बारामती लोकसभा​ मतदारसंघात दौरा करण्याला महत्त्व आहे.

पुणे : अतिवृष्टीमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीच्या पाहणी दौऱ्यासाठी सरकार आणि विरोधी पक्षातील नेतेमंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर पोचत आहेत. आता महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने बारामतीत लक्ष घातले आहे.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरूरचे माजी खासदार, उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील हे बारामती लोकसभा मतदारसंघाचा उद्या (ता. 19 ऑक्‍टोबर) दौरा करणार आहेत. दौऱ्याचा कार्यक्रम आढळरावांच्या कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. 

दरम्यान, शिवसेनेच्या नेत्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा पाहणी दौरा जाहीर केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, आतापर्यंत शिवसेनेच्या कोणत्याही मोठ्या नेत्यांनी असा दौरा केलेला नाही. त्यातही आता राज्यातील सत्तेत एकत्र असताना शिवसेना नेत्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात दौरा करण्याला महत्त्व आहे. शिवसेनेचे पदाधिकारी उद्या सोमवारी (ता. 19) इंदापूर, दौंड, बारामतीचा दौरा करणार आहेत. 

दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही उद्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी उद्या बारामतीत आहेत. 

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अनपेक्षितरित्या आढळराव यांचा, तर मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून पार्थ पवार यांचा पराभव झाला. शिरूर मतदारसंघात पराभव झाल्यानंतर आढळराव सक्रीय राजकारणापासून दूर जात, अमेरिकेतील आपल्या व्यवसायात व्यस्त होतील, अशी चर्चा राजकीय क्षेत्रात होती. मात्र, आढळराव यांच्यावर पक्षाने उपनेतेपदाची जबाबदारी देत, पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या संघटना बांधणीची जबाबदारी दिली. कोरोना संकटकाळात आढळराव सर्वसामान्यांच्या मदतीला धावून गेले होते. 

आता उपनेते आढळराव आणि खासदार बारणे यांनी शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाबरोबरच बारामती लोकसभा मतदारसंघात दौरे करण्यास सुरूवात केली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार बारणे आणि आढळराव पाटील हे इंदापूर, दौंड, बारामतीचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हा दौरा होत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. तर या दौऱ्यात संबधित तालुक्‍याचे शासकीय अधिकारी देखील सहभागी होणार आहेत. दौऱ्याचा अहवाल पक्ष कार्यालयाबरोबर मुख्यमंत्री कार्यालयालाही पाठविण्यात येणार आहे. 
 

असा असणार सोमवारचा (ता.19 ऑक्‍टोबर) दौरा 

►दुपारी 1 वाजता : वडगाव निंबाळकर (ता. बारामती) 
►दुपारी 2 वाजता : सणसर (ता. इंदापूर) 
►दुपारी 3 वाजता : लासुर्णे (ता. इंदापूर) 
►दुपारी 4 वाजता : राजेगाव (ता. दौंड) 
►सायंकाळी 5 वाजता : मलठण (ता. दौंड) 
►सायं. 6 वाजता : स्वामी चिंचोली (ता. दौंड) 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख