सचिन वाझे प्रकरणाबाबत शरद पवार म्हणाले... - Sharad Pawar's first reaction on Vaze case | Politics Marathi News - Sarkarnama

सचिन वाझे प्रकरणाबाबत शरद पवार म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 14 मार्च 2021

सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी (ता. १३) रात्री साडेअकराच्या सुमारास अटक केली.

पुणे: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानासमोर स्फोटकांनी सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी (ता. १३) रात्री साडेअकराच्या सुमारास अटक केली.

सचिन वाझे यांच्या अटक प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. पत्रकारांनी वाझे यांच्या अटकेवर प्रश्न विचारला असता, तो स्थानिक विषय असून मी अधिक भाष्य करणार नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी रविवारी दिली. 

तत्पूर्वी सचिन वाझे यांना शनिवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली. अटकेपूर्वी तब्बल १३ तास वाझे यांची एनआयएकडून चौकशी केली गेली. गेल्या १५ दिवसांत अंबानी स्फोटके प्रकरणातली ही सगळ्यात मोठी घडामोड म्हणून पाहिली जातेय. विशेष बाब म्हणजे अटकेची चाहूल लागल्याने सचिन वाझे यांनी यापूर्वीच न्यायालयात धाव घेत अंतरिम जामिनासाठी प्रयत्न केले होते. परंतु, न्यायालयाने प्रथमदर्शी अर्जदाराविरोधात पुरावे दिसत असल्याचे निरीक्षण नोंदवत जामिनीचा अर्ज फेटाळला. 

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर भाजपही चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळते आहे. या कटात आणखी कोण-कोण शामिल आहे, हे सत्य बाहेर येण्याकरिता वाझे यांची नार्को चाचणी तातडीने केली जावी, अशी मागणी भाजपतील काही नेत्यांनी केली आहे. दरम्यान, सचिन वाझेंच्या अटकेनंतर ठाण्यातून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये इनोव्हातून जाणारे दोघे चालक व एका व्यावसायिकाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. 

वाझे प्रकरणाबाबत राम कदम काय म्हणाले? 

'या कटात सहभागी असलेल्या लोकांची नावे समोर येण्यासाठी वाझे यांची नार्कोटेस्ट केली जावी. कर नाही त्याला डर कशाला? वाझे यांची नार्को टेस्ट करून दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ देत. सचिन वाझे यांची नार्को टेस्ट झाली नाही तर ठाकरे सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर येईल', असे भाजप नेते राम कदम म्हणाले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख