गाव सोडून आलेल्या लोकांबद्दल काय बोलायचे : पवारांचा चंद्रकांतदादांना टोला - Sharad Pawar criticism of Chandrakat Patil | Politics Marathi News - Sarkarnama

गाव सोडून आलेल्या लोकांबद्दल काय बोलायचे : पवारांचा चंद्रकांतदादांना टोला

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येमुळे सध्या राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे.

पुणे : पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येमुळे सध्या राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप होत असताना राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार गप्प का, असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर पवार यांनी पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

ज्यांना आपले स्वतःचे गाव सोडून राहण्यासाठी अन्य गावी जावे लागते, अशा लोकांबद्दल मी बोलायचे का? असा सवाल विचारत पवार यांनी पाटील यांना टोला लगावला आहे. न्याय व्यवस्थेच्या सद्यस्थितीवर माजी सरन्यायधीश रंजन गोगोई यांनी केलेल्या विधानावरही पवारांनी भाष्य केले. पुण्यात सुरु असलेल्या 'खयाल यज्ञ' संगीत महोत्सवाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. 

पूजा चव्हाणचा मोबाईल मिळवण्याचा प्रयत्न करणारी 'ती' व्यक्ती कोण?

राज्यसभा खासदार आणि माजी सरन्यायधीश रंजन गोगोईंनी शनिवारी केलेले विधान अत्यंत धक्कादायत आहे. हे विधान म्हणजे न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा प्रयत्न तर नाही, ना याचाही विचार व्हावा. परंतु या विधानामुळे प्रत्येकाच्या मनात चिंता निर्माण होणार याबद्दल आपल्या मनात शंका नसल्याचे पवार म्हणाले. देशातील न्यायव्यवस्था किती उच्च आहे. असे गेल्याच आठवड्यात न्यायधिशांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते, याकडे पवारांनी लक्ष वेधले. 

गोगोई यांनी एखादे उदाहरण देशापुढे आणायला पाहिजे होते!
 

पुण्यात 'खयाल यज्ञ' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आज शरद पवार उपस्थित होते. पवारांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील, भाजपचे खासदार गिरिश बापट उपस्थित होते. तीन दिवसीय खयाल यज्ञ कार्यक्रमाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आरती अंकलीकर-टिकेकेर, पंडित राहुल देशपांडे, देवकी पंडित, मंजुषा पाटील, पंडित राजन साजन मिश्रा आज त्यांची कला सादर करणार आहेत. 

काय म्हणाले होते गोगोई ?  

भारतीय न्यायव्यवस्था जर्जर झाल्याचे सांगत माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी कशासाठीही न्यायालयात जाणार नसल्याचे वक्तव्य केले आहे. तुम्ही न्यायालयात गेला तर स्वत:चेच खराब झालेले कपडे धुवत बसावे लागते. न्यायालयात गेल्यावर तुम्हाला पश्चाताप होतो. तिथे न्याय मिळत नाही, असेही गोगोई म्हणाले.

एका वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गोगोई यांनी भारतीय न्यायव्यवस्थेवर परखडपणे भाष्य केले. गोगोई हे नोव्हेंबर 2019 मध्ये निवृत्त झाले असून ते मार्च 2020 मध्ये राज्यसभा सदस्य झाले. गोगोई म्हणाले, ''तुम्हाला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था हवी आहे. पण आपल्या न्यायव्यवस्थेची स्थिती खूप दयनीय झाली आहे. केवळ लाखो रुपये असलेले लोकच सर्वोच्च न्यायालयात जाण्याची जोखीम पत्करतात.'' 

सरन्यायाधीश असताना गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले होते. या प्रकरणाचा निवाडा गोगोई यांनी स्वत:च केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केला होता. त्याला उत्तर देताना गोगोई यांनी हे वक्तव्य केले. ''तुम्ही न्यायालयात गेल्यानंतर तुमच्या वैयक्तिक गोष्टी सार्वजनिक करता. पण तुम्हाला कधीच न्याय मिळत नाही. मीही न्यायालयात जाणार नाही. आपल्या न्यायाव्यवस्थेच्या स्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे,'' असे गोगोई यांनी सांगितले. 

एखाद्यावर आरोप करताना सत्य परिस्थितीची माहिती हवी. या प्रकरणासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र समिती नेमली होती. हीच आपल्या देशाची समस्या आहे. काही गोष्टी माहिती नसताना आपण त्यावर भाष्य करतो, अशी टीकाही गोगोई यांनी केली.

भोपाळ येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये न्यायालयीन काम करताना कसे वागावे, मूल्ये, तत्व शिकविली जात नाहीत. तर सागरी कायदे अशा गोष्टी शिकविल्या जातात. त्याचा न्यायालयीन कामाशी संबंध नसतो. न्यायव्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी रोडमॅप तयार करायला हवा, असेही गोगोई यांनी स्पष्ट केले.

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख