शिक्रापूर : शरद सहकारी बँकेला सुमारे सव्वा तीन कोटींची तारण जमीन परस्पर विकून फसविण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणी शिक्रापूरातील पाच जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. बॅंकेच्या वतीने राजाराम डेरे यांच्या फिर्यादीवरुन शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचेशी संबंधित असलेल्या व जेष्ठ उद्योगपती देवेंद्रशेठ शहा अध्यक्ष असलेल्या शरद सहकारी बॅंकेला शिक्रापूरात पाच जणांनी संगनमताने फसविण्याचा प्रयत्न केला आहे. त्या प्रकरणी पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. शदर सहकारी बॅंकेच्या २६ शाखा आहेत.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी : २६ नोव्हेंबर २०१३ रोजीपासून वेळोवेळी शिक्रापूरातील सुरेश काशिनाथ भुजबळ यांनी त्यांच्या सुरेश काशिनाथ भुजबळ प्रमोटर्स अॅण्ड डेव्हलपर्स या नावावर व्यवसायवाढीसाठी शरद सहकारी बॅकेच्या मंचर शाखेकडून तीन कोटी रूपये कर्ज घेतले. यासाठी त्यांनी शैला सुरेश भुजबळ, जयश्री शिवाजी धुमाळ, राजेश शिवाजी धुमाळ, व्यंकट चलसानी यांचेशी संगनमत करून तारण म्हणून बॅंकेकडे गहाण खताने सणसवाडी (ता.शिरूर) येथील गट नंबर १०११ जमिनीतील ८३ गुंठ्यांपैकी ६३ गुंठे जमीन तारण ठेवली.
पुढील काळात याच गहाण क्षेत्रातील काही क्षेत्र त्यांनी परस्पर विक्री करून बॅकेची फसवणूक केली. आरोपींनी हे सर्व करताना बॅकेला विश्वासात घेवून तसेच या व्यवहारातील रकमेतून कर्ज रक्कम भरणार असल्याचे सांगत त्या बदल्यात चेक देवून व बॅंकेकडून तारण म्हणून ठेवलेल्या जमिनीचे रिलीज डीड ताब्यात घेवून बॅकेची फसवणूक केली. तसेच या व्यवहारानंतर करावयाच्या कर्ज परतफेडीच्या उद्देशाने बॅकेला दिलेले धनादेश बांउन्स केल्याचा ठपका ठेवण्यात आला.
या व्यक्तींनी सन २०१३ पासून ३ कोटी २८ लाख ८ हजार ७२० रुपयांची फसवणूक केली असून बॅंकेच्या वतीने असलेली फिर्याददार राजाराम मारुती डेरे (रा.नारायणगाव, ता.जुन्नर) यांच्या फिर्यादीनुसार वरील पाच जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे करीत आहेत.
या प्रकरणातील गहाण जमिन लिलाव प्रकरणी सदर प्रक्रीया पुन्हा राबवावी, असे जिल्हा उपनिबंधकांचे पत्र बॅंकेला १ फेब्रुवारी रोजी दिले गेले. त्याच दिवशी आमचे विरोधात तक्रार दाखल करण्याची घाई बॅंकेने केली. याबाबत आमचेवर अन्याय होत, असून कायदेशीर दाद आम्ही मागत असल्याचे सुरेश भुजबळ यांनी सांगितले आहे.
Edited By - Amol Jaybhaye