ज्येष्ठ समाजसेवक प्रा. विलास वाघ यांचे कोरोनाने निधन  - Senior Social Worker Vilas Wagh dies by corona | Politics Marathi News - Sarkarnama

ज्येष्ठ समाजसेवक प्रा. विलास वाघ यांचे कोरोनाने निधन 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 25 मार्च 2021

वाघ यांच्या निधनामुळे आंबेडकरी विचारांचा सच्चा पाईक व प्रबोधनाच्या चळवळीतील मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

पुणे : फुले शाहू आंबेडकरी विचारांचे अग्रदूत, सुगावा प्रकाशनचे सर्वेसर्वा, परिवर्तन मिश्र विवाह चळवळीचे अग्रणी, समता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वंचित, दुर्लक्षित समाज घटकांच्या शिक्षणासाठी झटणारे ज्येष्ठ कार्यकर्ते विलास वाघ यांचे कोरोनामुळे गुरुवारी (ता.२५ मार्च) पहाटे सहाच्या सुमारास निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी उषा वाघ आहेत.

पुण्यातील खासगी रुग्णालयात वाघ यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाघ यांच्या निधनामुळे आंबेडकरी विचारांचा सच्चा पाईक व प्रबोधनाच्या चळवळीतील मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जात‌ आणि वर्गविरहित समाजाच्या निर्मितीचे ध्येय उराशी बाळगून प्रा. वाघ‌ हे शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांद्वारे आयुष्यभर धडपडत राहिले. त्यांच्या अनेक कामांमध्ये पत्नी उषा यांचे मोलाचे सक्रिय सहकार्य त्यांना लाभले. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि इतरांसाठी आधार देणारे व्यक्तिमत्त्व असा विलास वाघ यांचा लौकिक होता. वाघ यांचे सामाजिक काम चौफेर होते. जाती निर्मूलन, प्रौढ शिक्षण, वसतिगृहे, परिवर्तन मिश्र विवाह संस्था आणि साहित्याच्या माध्यमातून प्रबोधन असे काम त्यांनी उभे केले होते. 

खासगी कार्यालयांवर आता 'नजर'; 50 टक्के उपस्थितीची विशेष पथके करणार तपासणी

वेश्या व्यवसायातील महिलांच्या मुलांसाठी त्यांनी संस्था सुरू केली होती. दोन आश्रमशाळा, चार वसतिगृहे आणि एका महाविद्यालयाचा डोलारा वाघ यांनी उभा केला आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध 'सुगावा' प्रकाशन आणि मासिक देखील ते चालवत होते. प्रकाशनाच्या माध्यमातून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक पुस्तके त्यांनी प्रकाशित केली.

परिवर्तन मिश्र विवाह संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जातीअंतच्या दिशेने समाज जाण्यासाठी अनेक आंतरजातीय-धर्मीय विवाहांना पाठींबा दिला. राष्ट्र सेवा दलाच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले होते. ते स्वत:ला आंबेडकरवादी समजत. दीन-दलित हा त्यांच्या सामाजिक कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. पुणे जिल्ह्यातील भुकूम इथे दलित कुटुंबांना घेऊन त्यांनी सामूहिक शेतीचा प्रयोगदेखील यशस्वी केला होता. सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले आहे. त्यांच्या सुगावा मासिकाला २००३ मध्ये 'इंटरनॅशनल मिशन कॅनडा' हा पुरस्कार मिळाला होता. पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार त्यांना मिळाला होता. 

कोरोनाचा उद्रेक; पुढील १०० दिवस महत्त्वाचे....
 

पुणे विद्यापीठातील प्रौढ निरंतर शिक्षण विभागात 1981 ते 86 दरम्यान त्यांनी रीडर म्हणून काम केले. विद्यापीठातील नोकरीचा 1986 मध्ये राजीनामा देऊन त्यांनी पूर्णवेळ सामाजिक कार्यास सुरुवात केली. सर्वेषा सेवा संघामार्फत देवदासींच्या मुला मुलींसाठी पहिले वसतिगृह वाघ यांनी सुरु केले होते. अनेक विषयांवर त्यांनी लेखन केले आहे. त्यामध्ये आंबेडकरी भावनांचा विद्ध्वंस, बौद्ध धर्मात शिक्षेची संकल्पना, बौद्ध धम्माचे आचरण कसे करावे, तंट्या भिल्ल या पुस्तकांचा समावेश आहे.

विलास वाघ यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांतून परिवर्तनाची चळवळ पुढे नेणारे कृतीशील विचारवंत आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. प्रा. वाघ यांनी सुरु केलेली वंचित, उपेक्षित वर्गाच्या न्याय्य हक्काची लढाई पुढे नेणे, ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत पवार यांनी भावनाव्यक्त केल्या.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख